इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. संगम नाक्यावर ही घटना घडली. एका अफवेमुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या चेंगराचेंगरीत काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोकांनी त्यांच्यावर धाव घेतली. या घटनेनंतर ७० हून अधिक रुग्णवाहिका संगम तीरावर पोहचल्या. जखमी व मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज महाकुंभात मौनी अमावस्येला स्थान असून त्यानिमित्त शहरात ५ कोटी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रात्री उशीरापर्यंत ४४ घाटांवर मोठ्या प्रमाणात भाविक स्थान करतील असा अंदाज होता. त्यात ही घटना घडली. विशेष म्हणज संपूर्ण शहरात ६० हजाराहून जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत.
या घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे रवींद्र पुरी म्हणाले की, घडलेल्या घटनेने आम्हाला खूप दु:ख झाले आहे. हजारो भाविक आमच्यासोबत होते. जनहितार्थ आम्ही ठरवले आहे की, आखाडे आजच्या स्थानात सहभागी होणार नाहीत. मी लोकांना आवाहन करतो की, आजच्या एेवजी वसंत पंचमीला स्थानासाठी यावे.
पंतप्रधानांचा चारवेळा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चारवेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथांना फोन केल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले की, मी तमाम संत, भक्त, राज्यातील आणि देशातील जनतेला आवाहन करतो की, अफवांवर लक्ष देऊ नका, संयमाने वागा, प्रशासन तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत आहे…
अखिलेश यादव यांची टीका
या घटनेनंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाकुंभासाठी आलेल्या संत-भक्तांमध्ये व्यवस्थेविषयी विश्वास निर्माण व्हावा, यासाठी महाकुंभाचा कारभार आणि व्यवस्थापन उत्तर प्रदेश प्रशासनाऐवजी लष्कराकडे तातडीने सोपविणे आवश्यक आहे. जागतिक दर्जाची व्यवस्था’ करण्याचा प्रचार करतांना केलेल्या दाव्यांतील सत्यता आता समोर आली आहे, तेव्हा असे दावे करून खोटा प्रचार करणाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ज्यांच्यामुळे आपले नुकसान झाले, त्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारावी..