नवी दिल्ली/हरिद्वार – येथील कुंभमेळ्याची सांगता करण्यात आली असली तरी त्याचे कवित्व अद्यापही सुरूच आहे. सोमवती अमावस्येनिमित्त झालेल्या शाही स्नानावेळी तब्बल ३१ लाख भाविक आल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र, साधू, प्रशासन, पोलिस, सरकार या सर्वांनीच वेगवेगळी आकडेवारी सादर केली आहे. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना लाखोच्या संख्येत भाविक जमलेच कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हरिद्वार पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, हरिद्वारमध्ये शाही स्नाना आधी ४ दिवस गंगाघाट पूर्णपणे रिकामा होता. केवळ ३४९ भाविकांनी नोंदणी केली. नोंदणीनुसार केवळ १,७७४ भाविक हरिद्वार येथे आले होते. कारण कोविड -१९ च्या नियमानुसार नोंदणीशिवाय हरिद्वारला येण्यास परवानगी नव्हती. शाही स्नानासाठी हरिद्वार हद्दीतून ३५७ वाहने परत पाठविण्यात आली. हरिद्वार हॉटेल्स, धर्मशाळा आणि रात्रीच्या बसमध्ये ६ लाख जण राहण्याची क्षमता आहे.
शाहीस्नानाच्या दिवशी केवळ ६ हजार ४५ वाहने सोडण्यात आली आणि ३२ हजार ९५ प्रवासीच शहरात दाखल झाले. तसेच हरीद्वार हद्दीत १७ गाड्यांमधून सुमारे ८ हजार प्रवासी दाखल झाले. तसेच बसेसद्वारे १५ हजार प्रवासी आले. त्यामुळे सर्व आकडेवारी पाहिली तर केवळ ७० हजार भाविकच स्नानाला आले.
मग ३१ लाख ३४ हजारांचा आकडा आला कुठून? असा सवाल उपस्थित होत आहे. हा आकडा हरिद्वार आणि ऋषिकेशचा असून यात संत आणि स्थानिक नागरिकांचाही समावेश असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावातही हरिद्वारला ३१ लाख ३४ हजार भाविक जमलेच कसे असाही सवाल उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ कोटी ८० लाख भाविक आणि प्रवाशांसाठी नियोजन तयार केले होते. आणि त्याच मार्गाने रहदारीची योजनाही राबविली गेली. परंतु केवळ सुमारे ३१ लाख भाविक आणि प्रवासी आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रशासन, पोलिस आणि सरकार वेगवेगळी आकडेवारी सादर करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला असून कोरोनाच्या संकटात एवढे भाविक एकत्र आल्याने कोरोनाचा विस्फोट झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सांगितले जात आहे.
बघा हा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=461632744892080