नवी दिल्ली – देशभरातील विविध राज्यात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच आता श्री क्षेत्र हरिद्वार येथील कुंभमेळ्यात देखील कोरोनाचा उद्रेक झाला आहे. याठिकाणी १०२ जण बाधित झाले असून यात साधू महंत आणि भाविकांचा समावेश आहे. सोमवारी (दि. ११) शाही स्नानाच्या पर्वणीत सुमारे ३१ लाखांचा पेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली असून राज्य शासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विविध राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय केले जात असताना देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान सोमवती अमावास्येच्या पर्वावर हरिद्वार तिर्थक्षेत्री महाकुंभाच्या शाहीस्नानाला भाविकांची प्रचंड गर्दी झाली. यावेळी शाहीस्नानासाठी आलेल्या अनेक आखाड्यांतील साधू , महंतांना कोरोना झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाला गर्दी नियंत्रित करण्यात अपयश येत असून कोरोना नियमांचे पालन होत नसून अनेक जण मास्क विना फिरत आहेत. याच दरम्यान महाकुंभमेळ्यात आखाडयामध्ये साधू व भाविक यांची प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना गर्दीला अटकाव करणे अशक्य झाल्याचे सांगण्यात येते.
हरिद्वारमध्ये लाखो साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाकडून शाही स्नानाच्या पूर्वसंध्येला सुमारे १८ हजार भाविकांची चाचण्या करण्यात आल्या, तेव्हा सुमारे १०० पेक्षा जास्त साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे यात शाहीस्नानापूर्वी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यासह अनेक महंतांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली. त्यामुळे या सर्व संता महंतांना शाहीस्नान करता आले नाही. हरिद्वारला येण्यापूर्वी भाविकांनी कोरोना नसल्याचा रिपोर्ट सोबत आणणे बंधनकारक केले होते. तसेच हरिद्वारमध्येही दररोज ५० हजार जणांची चाचणी करण्यात येत आहे.
दरम्यान, महाकुंभावर ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. तरीही स्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. अनेक भाविक विनामास्क स्नान करताना दिसून आले. सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होताना आढळून आले.