कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…
दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार-मुख्यमंत्री
साधूसंतांचे मार्गदर्शन आणि नागरिकांच्या सहकार्याने कुंभपर्व यशस्वी होण्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.
ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मुळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामतून २० हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरूवात होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कुंभमेळ्यासाठी रस्ते, महामार्ग दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य राखणे, चांगल्या घाटांची निर्मिती, जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, विकासकामे करतांना गोदाघाटाचे पुरातन रुप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे. नाशिक हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील २५ वर्ष टिकली पाहिजे आणि नाशिक पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे रुप बदलेल आणि शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे. नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत, रेल्वे सुविधा, बस स्थानकाची सुविधा, स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहीत करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. भविष्यातही कुंभच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न आहे. कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली. विकासकामे करतांना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही, तथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे. साधूसंतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावे, त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे. प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुर्नजागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली. याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर जागा असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ५०० एकर जागा आहे. अत्यंत कमी जागा असूनही २०१५ मध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील असे आयोजन व्हावे यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कुंभमेळ्याने नाशिक जगाच्या नकाशावर झळकेल-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल. कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे.
सोहळ्याकरिता दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सोहळा यशस्वी करण्यासाठी उत्तम नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रशासन कार्यरत आहे. मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने सुरक्षेची मोठी जबाबदारी शासन-प्रशासनावर असून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्यात येणार आहे. गोदावरीला दक्षिण गंगा म्हटले जाते आणि विकासकामांच्या शुभारंभाच्या माध्यमातून नाशिक शहरात विकासाची गंगा येत आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
साधूग्राम, स्वच्छता व्यवस्था, रामकुंड आणि कुशावर्तचे पावित्र्य आदी सर्व बाबींवर लक्ष देण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या प्रसिद्धीसाठी डिजीटल माध्यमांचा उपयोग करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. उत्तम नियोजनाद्वारे कुंभमेळ्याचा लौकीक जगभर पोहोचेल, असा विश्वास श्री.शिंदे यांनी व्यक्त केला.
स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होणार-गिरीष महाजन
कुंभमंत्री श्री.महाजन म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. मागील कुंभमेळ्याची दखल घेवून अमेरिकेत शासनाचा सन्मान करण्यात आला होता. यावर्षीदेखील दीड वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचा लौकीक जगभरात पोहोचणाार आहे. यावेळी गतवर्षीपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रयागराजच्या तुलनेत जागा कमी असल्याने येणारा कुंभमेळा सुरक्षित व्हावा यासाठी शासन आणि प्रशासन आतापासून वेगाने काम करीत आहे.
स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभमेळा होण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. कायदा-सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवण्यासाठी पोलीस दलातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नाशिक शहराचा विकास, पर्यटनाला चालना आणि रोजगार निर्मितीसाठी कुंभमेळा महत्वाचा असून साधू-महंत आणि नाशिकरांनी सहभागी व्हावे, घरचे कार्य समजून देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या आदरातिथ्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात डॉ.गेडाम यांनी कुंभमेळ्यानिमित्त करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. सुरक्षित आणि स्वच्छ कुंभमेळा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक, साधू-महंत, पर्यटक आणि नाशिकच्या नागरिकांना अद्वितीय धार्मिक, सांस्कृतिक पर्यटनाची अनुभूती मिळेल यादृष्टीने प्रशासन कार्यरत आहे. नाशिकच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनासह ही पर्वणी सर्वांगिण विकासाला चालना देणारी असेल असे प्रकल्प विचाराधीन आहेत. डिजीटल आणि अत्याधुनिक कुंभ करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही प्रकल्पासह ५ हजार ६५७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होत आहे. भारत सरकारकडून रेल्वे, रस्ते आदी विविध कामांसाठी ९ हजार ३८२ कोटी रुपयांचे प्रकल्प विविध स्तरावर प्रगतीपथावर आहेत. राज्य शासनाकडूनही पुढील टप्प्यात आणखी १० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. कामांना गती देण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर नाशिकमध्ये विकासाचा अमृतकुंभ येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला विविध आखाड्याचे साधू-महंत, आमदार किशोर दराडे, पंकज भुजबळ, ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहूल आहेर, मंगेश चव्हाण, दिलीप बोरसे, विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, एमएमआरडीए आयुक्त जलज शर्मा, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील,
कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी उपस्थित होते.
विकासकुंभाची अशी होणार सुरूवात
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नियोजित विकासकामांचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २ हजार २७० कोटी रुपये, तर नाशिक महानगरपालिकेतर्फे ३ हजार ३३८ कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे व्यापक पायाभूत सोयीसुविधा उभारणी, सुरक्षा व्यवस्थेचे बळकटीकरण, स्वच्छता, व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थेचे सुलभीकरण, धार्मिक पर्यटनाच्या सोयीसुविधांचे अद्ययावतीकरणासाठी महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कामांसाठी एकूण ५ हजार ६५७ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.
मुख्य कामांमध्ये नवीन पूल बांधण्यासाठी ९४ कोटी ८७ लाख रुपये, नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वयानासाठी ४३६ कोटी ५६ लाख रुपये, नाशिक शहरात मल:निस्सारण प्रकल्प उभारणीसाठी १ हजार ४७५ कोटी ५० लाख रुपये, नाशिक शहरात गोदावरी काठावर रामकाल पथनिर्मितीसाठी १२० कोटी ८८ लाख रुपये, नाशिक महानगरपालिकेतर्फे ६८४ कोटी रुपये किंमतीची पाणीपुरवठा योजना विस्ताराचे काम प्रस्तावित आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दोन हजार २७० कोटी ६० लाख रुपये किमतीचा रस्ते विकासाचा मोठा पायाभूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती, सुरक्षा, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यटनाच्या सुविधा व धार्मिक वारसा संरक्षणात मोठी भर पडणार आहे.







