इस्लामाबाद – पाकिस्तानातील तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव हे लवकरच भारतात परतण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सकारात्मक घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची उत्सुकता आता शमणार आहे.
जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु आता पाकिस्तान मध्ये नवीन विधेयक मंजूर झाल्याने जाधव यांची तुरूंगातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण जाधव यांच्या अटकेसाठी आणि फाशीच्या शिक्षेला रद्द ठरविण्याकरीता भारत सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान याचिका दाखल करणार आहे.
विशेष म्हणजे जाधव यांच्या सुटकेसाठी भारताला मदत करणारा कायदा पाकच्या संसदेने मंजूर केला आहे. संसदेत या विधेयकाबाबत पाकिस्तान सरकारला विरोधकांकडून कडक टीका सहन करावी लागली. नॅशनल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय न्यायालय (पुनरावलोकन व पुनर्विचार) विधेयक, २०२० मंजूर केले आहे.
सदर विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचे कायदा मंत्री फारोग नसीम म्हणाले की, जर हे विधेयक मंजूर केले नसते तर भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गेला असता आणि आयसीजेमध्ये पाकविरूद्ध अवमान कार्यवाही सुरू झाली असती. आयसीजेच्या निर्णयाला ध्यानात घेऊन हे विधेयक मंजूर झाले आहे. त्याचबरोबर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनीही या विधेयकाला कडाडून विरोध दर्शविला आहे.
भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव (वय ५१) यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांच्या कौन्सुलर प्रवेशाला नकार आणि फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्याकरिता भारताने पाक विरोधात आयसीजेचा आधार घेतला होता.
नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये निकाल दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांना शिक्षा ठोठावण्याच्या व शिक्षेच्या निर्णयाचा प्रभावीपणे आढावा घ्यावा आणि फेर विचार करावा. त्याचबरोबर कोणतीही उशीर न करता जाधव यांना भारतात प्रवेश देण्याची संधी देण्यात यावी. त्यानंतर आता जाधव यांचा भारतात येण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.