नवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचा वकील नियुक्त करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला भारताशी संपर्क साधण्याचे निर्देश इस्लामाबाद न्यायालयाने दिले आहेत. कुलभूषण जाधव यांचा वकील नियुक्त करण्यासाठी भारताकडे मागणी करण्यात आली आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते जाहीद हाफिज चौधरी यांनी सांगितले.
नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानने अटक केली होती. त्यांच्याविरोधात पाकिस्तानच्या न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात भारताने हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले होते.
कुलभूषण जाधव यांच्यावरील आरोप आणि शिक्षेवर पाकिस्तानने पुनर्विचार करावा. तसेच त्यांना भेटण्यासाठी भारताला परवानगी द्यावी, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जुलै २०१९ मध्ये दिला होता. विशेष अध्यादेश आणून पाकिस्तान सरकारने हा खटला इस्लामाबाद न्यायालयात पुन्हा सुरू केला.
इस्लामाबाद न्यायालयाच्या कक्षेत हा खटला चालवला जाऊ शकत नाही, असे भारताचे म्हणणे होते. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी सुनावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयीन कक्षेचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इस्लामाबाद न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर भारताच्या शंका दूर करण्याचे आदेश न्यायालयाने पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिले.