पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात कुकडी डाव्या कालव्यातून २२ मे पासून चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, रोहित पवार, अतुल बेनके, अशोक पवार (दूरदृष्यप्रणालीद्वारे), कालवा सल्लागार समितीचे सदस्य सुदाम पवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले, धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी अपेक्षित क्षमतेने कालव्याच्या शेवटच्या क्षेत्राला (टेल) मिळावे; पाण्याची गळती रोखण्यासाठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. नदीवरील तसेच कालव्यावरील अनियंत्रित व अनधिकृत पाणीउपशावर नियंत्रण आणावे. या प्रकल्पातून पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती, पिण्यासाठी आणि उद्योगाना पाणी दिले जाते. पाण्याचे आवर्तन सोडताना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घ्याव्यात. त्यामुळे सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावे.
धरणातील गाळ काढल्यास धरणातील पाणीसाठी वाढण्यास मदत होते. त्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे धरणातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत नेण्याबाबत नियोजन करावे. पिंपळगाव जोगे धरणातील पारनेर हद्दीतील १५ कि.मी. अस्तरीकरणाच्या कामाला नियामक मंडळाच्या मंजूरीनंतर सुरुवात करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागात मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेला. सध्या शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रिक्त पदे भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रक्रिया ही सुरु आहे. तूर्तास क आणि ड संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरून काम सुरू करावे, अशा सूचनाही पालककमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी पाणी सोडण्याच्या नियोजनाबाबत उपस्थित आमदार महोदयांनी विविध सूचना केल्या. बैठकीच्या सुरवातीला कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठा व उन्हाळी हंगाम २ च्या नियोजनाबाबत सादरीकरण केले. बैठकीस कार्यकारी अभियंता स. ज. माने, उ. द. धायगुडे, स्वप्निल काळे आदी उपस्थित होते.
Kukdi Left Canal 4th Discharge Nagar District