मुंबई –राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहिम राबविली जात आहे. या अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. दि. १ जुलैपर्यंत ही मोहिम सुरु राहणार असल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
दरवर्षी १ जुलैपासून ही मोहिम राबविली जाते. मात्र तो पर्यंत खरीत पिकांचा पेरणी आणि जमीन मशामगतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन १ जुलै पुर्वी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.
२१ जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रीय, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे. उद्या २४ जून रोजी एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बिया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
२५ जून रोजी विकेल ते पिकेल,२८ जूनला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, २९ जूनला रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादक वाढीसाठी सहभाग, ३० जूनला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. १ जुलैला कृषी दिनी मोहिमेचा समारोप होणार आहे.
मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करण्याबाबत कृषी संचालक विकास पाटील यांनी सूचना केल्या आहेत.