मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रात कृषी तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांमधील संशोधन, शेतमाल प्रक्रिया उद्योग आदी क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. इंग्लंडपेक्षा महाराष्ट्रात उत्पादन खर्च कमी आहे. तेथील शेतकरी आणि उद्योजकांनी भागीदारीसाठी महाराष्ट्रात यावे, येथे त्यांचे स्वागत होईल, असे प्रतिपादन राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
ब्रिटीश उप उच्चायुक्तालयातील द्विपक्षीय व्यवहार प्रमुख जॉन निकेल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र आणि इंग्लंडमधील परस्पर संबंध वृद्धींगत करण्याबरोबरच गुंतवणूक वाढविण्याबाबत चर्चा झाली.
राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल म्हणाले, राज्यातील समृद्धी महामार्गामुळे राज्यातील सर्व विभाग जोडले गेले आहेत. सर्व विभागांमध्ये स्थानिक गरजांनुसार उद्योगवाढीला प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यातील आंबा, डाळींब, केळी अशा फळांना मोठे निर्यातमूल्य आहे. फलोत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी देखील येथे वाव आहे. इंग्लंडमधील शेतकऱ्यांनी राज्यातील शेतीला भेट द्यावी, कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन करुन तंत्रज्ञानासह महाराष्ट्रात भागीदारी तसेच गुंतवणुकीसाठी आपले स्वागत होईल, असेही त्यांनी सांगितले.