मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, जेएनपीएने आयात-निर्यात आणि देशांतर्गत शेतमालावर आधारित प्रक्रिया प्रकल्पाचा विकास आणि जेएनपीए येथे साठवणूक सुविधा उभारण्यासाठी 30 डिसेंबर 2024 रोजी मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना बहाल पत्र (LoA) जारी केले. हा प्रकल्प बंदर संकुलात 27 एकर जमिनीवर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 284 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, दरवर्षी सुमारे 1.2 दशलक्ष टन कार्गो म्हणजेच माल हाताळण्याची क्षमता विकसित करेल आणि कृषी मालासाठी प्रक्रिया, साठवण आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून देशाच्या कृषी व्यापारात लक्षणीय योगदान देईल अशी अपेक्षा आहे. जेएनपीए ने दिलेली ही सुविधा देशातील अशाप्रकारची पहिलीच सुविधा असेल. याअंतर्गत प्रक्रिया, वर्गीकरण, पॅकिंग आणि प्रयोगशाळा अशा सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध असतील अशा प्रकारे याची रचना केली असून, ज्यातून जेएनपीए ची अन्न सुरक्षा आणि व्यापार नियमांबद्दलची वचनबद्धता दिसून येते तसेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेश आणि गुजरात यांसारख्या इतर राज्यांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पाला 16 जुलै 2024 रोजी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंजुरी दिली.
या प्रकल्पामुळे भारताच्या परिचालन क्षमतेत वाढ होईल आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कृषी व्यापाराला चालना मिळेल असा विश्वास जेएनपीए चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी व्यक्त केला. या नवीन प्रकल्पासह, जेएनपीए देशाच्या कृषी निर्यात पायाभूत सुविधांना बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. या नवीन वर्षात वृद्धी आणि विकासाला गती देत प्रमुख प्रकल्पांची जलद गतीने आणि निर्धारित वेळेत पूर्णता करण्याला आमचे प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी सुरू करण्यात आलेले, जेएनपीए हे मोठ्या -कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदरामध्ये रूपांतरित झाले आहे.
सध्या जेएनपीए पाच कंटेनर टर्मिनल चालवते: न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनल्स NSFT, न्हावा शेवा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनल (एनएसआयसीटी), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (एनएसआयजीटी), भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (बीएमसीटीपीएल)आणि एपीएमटी. बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी उथळ पाण्याचा धक्का आणि दुसरा द्रव मालवाहू टर्मिनल आहे जो BPCL-IOCL कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेल्या किनारी धक्क्याद्वारे व्यवस्थापित केला जातो. 277 हेक्टर जमिनीवर वसलेले, जेएनपीए भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह, वैशिष्ट्यपूर्वक डिझाइन केलेले बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (एस ई झेड) देखील चालवते. जेएनपीए महाराष्ट्रातील वाढवण येथे बारमाही, डीपड्राफ्ट, ग्रीनफिल्ड बंदर विकसित करत आहे. हे जागतिक स्तरावरील अव्वल 10 बंदरांमध्ये स्थान मिळवण्यासाठी सज्ज असून स्थापनेपासूनच ते 100% हरित बंदर असेल.