नाशिक -जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कृषि माल निर्यात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक शेतकऱ्यांनी या सप्ताहात सहभाग नोंदवून लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, या सप्ताहामध्ये विविध शेतकरी मेळावे व प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. तसेच निर्यातक्षम शेतमालाची शेतनोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे अर्ज भरुन घेणे, लेबल क्लेम, किटक नाशकांच्या वापराबाबत प्रचार प्रसिद्धी करणे, शेतमाल निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकरी उत्पादन कंपन्यांना मार्गदर्शन करणे, निर्यात विषयक योजनांची माहिती इच्छुक निर्यातदारांना देणे इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सन २०२०-२१ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील ३७ हजार ५९० निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, ६८ डाळींब उत्पादक शेतकरी आणि २३ भजीपाला उत्पादक शेतकरी यांनी निर्यातीसाठी शेतनोंदणी केली होती. त्याअनुषंगाने आता विड्याची पानमळे (बीटलनेट), केळी, बोर (अदर फ्रुट क्रॉप नेट), कांदा(ओनियन नेट) यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांची नोदणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. असेही, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे यांनी सांगितले आहे.