सौ.अर्चना प्रविण देवरे
जिच्यामुळे आहोत आम्ही आज इथे विराजमान…जिने झेलला दगड शेणांचा मार….देवून गेली आम्हास नवे…जीवनदान….नाही तर जगलो असतो आम्ही…..चार भिंतीतल बंदिस्त असं रान……अभिमान आहे आम्हास तीचा…..जाऊ देणार नाही व्यर्थ तीचे काम……सावित्रीच्या लेकी आम्ही…..मानाने करतो तीला सलाम…..ज्यांच्या मुळे ही लेखणीच आमच्या हाती आली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल लिहितांना एक स्त्री म्हणून खरंच रक्त सळसळते आमचे, श्वासात एक नवी ऊर्जा मिळते, शब्दात प्राण उतरतो आमच्या, इतकी प्रेरणा मिळते की, आज त्या जर नसत्या तर आम्ही कुठे असतो…नुसती कल्पना जरी केली तरी किडया मुंगीची अवस्था डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यांच्या पेक्षा वेगळ असं आयुष्य सावित्रीबाई आम्ही जगलो ही नसतो. त्यांनी रूजविलेला स्त्रीशिक्षणाचा पाया आज आम्हास उंच शिखरावर घेऊन गेला. त्या शिखरावरून पाहतांना खरंच वाटते की, स्त्री जन्मा तू आहेस सहनशीलतेची मुर्ती, नवनिर्मितीची प्रतीकॄती, पण तरी ही होतीस ना शिक्षणापासून परावॄत…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षीकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला आहे. ख-या अर्थाने आमच्या महिलांच्या मुक्तीदाता आहेत.
त्या काळी स्त्रींयांना चुल आणि मुल यापलिकडेच दुसर अस्तित्वच नव्हते. त्यावेळी शिक्षण हाच एक पर्याय आहे जो स्त्रीयांना गुलामगिरीतून बाहेर काढू शकेल आणि तिला मानाने जगायला शिकवू शकेल याच उद्देशाने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. मात्र हे शिक्षणाचे कवाडे उघडताना, महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाईंना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. प्रचलित प्रथेच्या विरोधात जाऊन स्त्रीची मर्यादा ओलांडून पुरूषप्रधान संस्कृतीत भक्कम पाय रोवण्यासाठी त्यांना शिवीगाळ, दगड, शेणा मातीचे गोळयांचा मार सहन करावा लागला. तरी ही त्या कुठेही न डगमगता, त्यांच्या ध्येयापासून टचू भर ही न हालता त्यांनी त्यांचे कार्य सुरू ठेवले. स्त्री शिक्षण हयाच मोठंया शस्त्रांचा वापर त्यांनी केला. आणि यासाठी ज्या भक्कम आधाराची, पाठबळाची आणि सातत्याने प्रेरित करणारा जो हात आणि साथ होती ती म्हणजे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची. त्यांनी एक पती म्हणून पत्नीला दिलेला सन्मान आणि आदर आज प्रत्येक स्त्रीला सन्मानित करून गेला. त्यांनी जर सावित्रीबाईना शिक्षणासाठी तयार आणि प्रोत्साहित केले नसते तर आजची स्त्री गुलामगिरीतून कधीच मुक्त झाली नसती.
सावित्रीबाईनी केवळ शिक्षण क्षेत्रापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित ठेवले नव्हते, महिलांच्या शिक्षणासह विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता त्यांनी विधवा पुनर्विवाह सुरू केले आणि १८५४ मध्ये विधवांसाठी आश्रम बांधले. स्त्री-बालहत्या रोखण्यासाठी त्यांनी नवजात मुलांसाठी ही आश्रम उघडले. आज देशात स्त्री भ्रूणहत्येचा वाढता कल पाहता त्या काळात स्त्री-बालहत्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि ते थांबवण्याचा प्रयत्न करणे किती महत्त्वाचे होते ते आज लक्षात येईल. त्यांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले.
त्यांच्या या कार्यामुळेच स्त्री शिक्षणाचा उगम झाला. त्यांच्या नुसत्या स्त्री शिक्षणाने स्त्रीया शिकून साक्षर झाल्या नाहीत तर त्या अंतराळापर्यत भिडल्या. त्यामुळे आजची प्रत्येक स्त्री साक्षर आणि सक्षम बनली आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तत्पर झाली आहे, ती फक्त शिक्षणामुळे. अज्ञानाचा आणि अडाणीपणाचा अंधकार झुगारून ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनवून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने आम्हाला धडाडीने आणि जिद्दीने जगायला शिकवलं. आज त्यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक स्त्रीने संकल्प करावा की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रूजविलेल्या स्त्री शिक्षणाच्या बीजाचे रुपांतर जरी उच्चशिक्षितांमध्ये झाले असले तरी त्या उच्च शिक्षणाबरोबर संस्कारा आणि माणूसकीची शिकवण आपल्या नवपिढीच्या मुलांमध्ये रुजवून शिक्षणाची ज्योत कायम तेवत ठेवली पाहिजे .. हेच त्यांना विनम्र अभिवादन असेल शेवटी जाता जाता इतकेच म्हणेण की, शिक्षणाच्या स्वर्गाची जिने उघडले दार, तीच सावित्री आहे आज जगाची शिलेदार …. अशा महान विद्येच्या देवतेला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी एक स्त्री म्हणून कॄतज्ञतेने अभिवादन करते.
सौ.अर्चना प्रविण देवरे
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक