ऑगस्ट क्रांती दिनी मिळाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण – मंत्री छगन भुजबळ
नाशिक – ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. देशभरातील नागरिक या आंदोलनातून उतरले. हे आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला मुख्य वळण देणारे आंदोलन ठरले असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक संघटना, हुतात्मा फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकच्या हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत आदरांजली अर्पण केली.
यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेस प्रदेश पदाधिकारी शरद आहेर, विजय राऊत, स्वातंत्र्यसैनिक उत्तम तांबे, अखिल भारतीय समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, माजी नगरसेविका कविता कर्डक, बबलू खैरे, अभिजित राऊत यांच्यासह हुतात्मा स्मारकातील पदाधिकारी व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.
छगन भुजबळ म्हणाले की, ‘ऑगस्ट क्रांती दिन’ स्वातंत्र्याची नवी पहाट होती. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. “आता कार्यकर्ता नाही तर नेता बना”, असे आवाहन देखील गांधीजींनी देशातील नागरिकांना केले. या स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण लागले होते. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण नेता झाला होता. स्वातंत्र्यासाठी ज्याला जे पटेल ते तो करत होता. क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतींना आपण अभिवादन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, या आंदोलनाची सुरुवात ‘गवालीया टॅंक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली आणि नंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. इंग्रजांना परिस्थिती हाताळताना नाकी नऊ आले. या आंदोलनात इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केले की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. इंग्रज कोणत्याही व्यक्तीला अटक करुन कुटूंबात डांबत होते. ब्रिटिशांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे जरी प्रचंड उद्रेक झाला असला तरी स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलनामुळेच उगवली, हे विसरता येणार असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळे एकसंघ राहिला आहे. डॉ.बाबासाहेब यांनी तयार केलेल्या घटनेचा जगभर अभ्यास केला जातो. या देशाच्या प्रगतीसह मनमोहन सिंग, नरसिंह राव यांच्याश नेत्यांनी देश प्रगती पथावर नेण्यास अधिक योगदान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन लढा लढला मात्र आता देशात तुकडे तुकडे पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सर्वांनी सर्व भेद विसरून राजकारणातील नकारात्मक काढून टाकली पाहिजे. आपल्याला हा देश महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही विचारांवर चालवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी जातीभेद विसरून एकसंघ रहायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले.