नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या येवला तालुक्यातील श्री जगदंबा देवस्थान कोटमगाव येथील ७५ कोटी रुपयांचा विकास आराखडा उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजूर होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची सोमवारी दि.१४ ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रालयात ही बैठक होऊन उच्चाधिकार समितीच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर होणार आहे.
येवला तालुक्यातील श्री.जगदंबा देवस्थान, कोटमगाव खुर्द हे महाराष्ट्रातील प्रसिध्य असे देवस्थान असून शारदीय नवरात्र उत्सवात तसेच वर्षभर लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. दररोज हजारो भाविकांची येथे वर्दळ असते, तरी तेथे नसलेल्या सुविधांच्या अभावी येणा-या पर्यटाकांना व भाविकांना अडचण निर्माण होते. त्यामुळे दर्शनासाठी येणारे पर्यटक व भाविक भक्त यांच्या सुविधेकरीता विविध विकासकामे करणे गरजेचे आहे.
शिर्डीकडे येवला मार्गे जाणारे भक्तही जगदंबा मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात तसेच पर्यटनासाठी अनकई किल्ला, दर्शनासाठी प्रति पंढरपूर असलेले विठ्ठल मंदिर तसेच पैठणी क्लस्टर इ. ठिकाणी येणारे पर्यटकही जगदंबा देवीचे दर्शनासाठी येतात. बाहेरगावाहून येणा-या भाविकांसाठी मुक्कामाची व्यवस्था होणे व इतरही सुविधा त्यांना मिळण्याची आवश्यकता असल्याने राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला दौऱ्यावर असतांना सदर प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सदरील कामाचे अंदाजपत्रक हे प्रशासकिय मान्यतेस्तव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रस्ताव उच्चाधिकार समितीच्या मंजुरीसाठी विभागाकडे सादर करण्यात आला होता.
या अंदाजपत्रकात बहुउद्देशिय सभागृह, सभामंडप, सभागृह आणि भोजनालय,भक्त निवास, स्वयंपाकगृह, कपडे बदलण्याची रुम, पुजा साहित्य दुकानांचे बांधकाम,बोट क्लबचे बांधकाम,ध्यानधारणा शेड,परगोला, गजेबो,बस स्टॅण्ड बांधकाम, कुंपण भिंतीचे बांधकाम,कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम, पॉर्कीग शेड बांधकाम, उद्यान व बागबगीचा, जमीन सपाटीकरण, अंतर्गत पाथवे चे बांधकाम, घाटाचे बांधकाम,पेव्हिंग ब्लॉक बसविणे, नदीकिनारी संरक्षक भिंत बांधकाम,नाल्यांची साफसफाई, पुल कम बंधाऱ्याचे बांधकाम,रोड फर्निचर,प्रवेशव्दाराचे बांधकाम,कॅन्टौंन,कार्यालय,पोलिस चौकी आणि सुरक्षा रक्षक खोली, सुलभ शौचालय,जुन्या इमारतीची दुरुस्ती, यासह अनुषंगिक कामांचा यामध्ये समावेश आहे.