कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर शहर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. परंतु येथे नेहमीच शांतता असते. मात्र काही वेळा येथील नागरिक संतप्त झाले तर मात्र ते कोणाचेही ऐकत नाहीत. काही दिवसांपूर्वी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्याचसोबत त्यांनी कोल्हापूरात मोर्चा काढला होता. या दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक महिलेने हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्राध्यापक महिलेच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मोर्चा काढण्याचा इशारा…
कोल्हापुरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना महिला प्राध्यापिकेने औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वाऱ्यासारखा व्हायरल झाला.त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या आहेत. शहरातील निवृत्ती चौकात मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख इंगवले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयात जाऊन त्या प्राध्यापक महिलेवर निलंबनाची कारवाई करावी आणि त्या महिलेने समस्त हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा या महिलेच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
शहरात तणावपूर्ण वातावरण…
काही दिवसापूर्वीच अहमदनगर येथे काही एका दहशतवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीमध्ये औरंजेबाचे छायाचित्र तथा फोटो घेऊन नृत्य केले होते. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचवेळी आता दुसरीकडे कोल्हापूर शहरात औरंगजेब प्रकरणावरून असाच तणाव निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कोल्हापूरातील निवृत्ती चौकात एकत्र आले. या पार्श्वभूमीवर या चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित महिलेला अटक करावी, अशी मागणी करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत या महिलेच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वांना ताब्यात घेतलं. दरम्यान या सर्व प्रकाराने निवृत्ती चौक परिसरासह शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.