कोल्हापूर/वाशिम (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षण खात्याचे भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे धिंडवडे निघाले, असतानाच आता त्याची लागण कोल्हापूर जिल्ह्यात देखील झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शिक्षण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या गैरकारभाराची तथा भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाल्याने भारताची भावी पिढी घडविणाऱ्या या शिक्षण विभागावरचा विश्वास उडत चालला आहे. त्यातच आता कोल्हापूर मध्ये देखील असेच एक भ्रष्टाचाराचे तथा लाचखोरीचे प्रकरण उघड झाले आहे. त्याच वेळी वाशिम जिल्हयात पोलीस खात्यातील देखील असाच एक गैरप्रकार समोर आला आहे.
लाचखोर शिक्षण सहसंचालक
एका शिक्षण संस्थेत नव्याने सुरू होणाऱ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्ससाठी आवश्यक सुविधा असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी झाली होती. त्यातील ३० हजार रुपये स्वीकारताना शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही रक्कम विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत कठरे आणि त्याचा स्टेनोग्राफर यांनी मागितल्याचे उघड झाल्याने एसीबीने तिघांना अटक केली. विभागीय शिक्षण सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय ४६, सध्या रा. कोल्हापूर, मूळ रा. पाचवड, ता. खटाव, जि. सातारा), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव (वय ३२, रा. पीरवाडी, ता. करवीर) आणि कनिष्ठ लिपिक अनिल दिनकर जोंग (वय ३४, रा. राशिवडे, ता. राधानगरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. राजाराम कॉलेजच्या आवारातील विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली. थेट विभागीय शिक्षण सहसंचालक एसीबीच्या कारवाईत अडकल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या विभागातील लाचखोरी समोर आली आहे.
दुचाकी परत करण्यासाठी लाच
दुसऱ्या एका घटनेत वाशिमच्या जऊळका पोलीस स्टेशमध्ये गुन्ह्यात दुचाकी जप्त केली होती. सदरची जप्त केलेली दुचाकी संबंधीतास परत करण्यासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल शफीक खान यांनी २ हजार रूपयांची मागणी केली होती. दरम्यान तडजोडी अंती १ हजार ३०० रूपये ठरले होते. मात्र याबाबत तक्रारदाराने गुपचूप वाशिमच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्यामुळे वाशिम लाचलुचपत विभागाकडे प्राप्त तक्रारीची पडताळणी करून पथकाने सापळा रचला. यानंतर पोलिस हेडकॉन्स्टेबल खानने तेराशे रूपये तक्रारदाराकडून स्वीकारताच पथकाने लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. राज्यातील सर्वच शासकीय विभागामध्ये लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे वाढल्याचे दिसून येत आहे.