कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याच्या सर्वच भागात लाचखोरीला ऊत आला आहे. कोल्हापुरातही लाचखोरी बोकाळली आहे. लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात आता दोन पोलिस अडकले आहेत. तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जुना राजवाडा पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार असे दोघा लाचखोरांचे नाव आहे. या दोघांना ८ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सांगली येथील एसीबीच्या पथकाने मध्यरात्री अडीच वाजता जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
एसीबीच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे याची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याला उपचारासाठी सीपीआर इथे दाखल करण्यात आले. तर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभार याला येथील एसीबी कार्यालयात नेण्यात आले. गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच स्थानिक गुन्हे शाखेतील दोघांना १० लाख रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडल होते. त्यांनतर आता पुन्हा जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधील दोघे रंगेहाथ सापडले आहेत.
Kolhapur Sangli Police ACB Raid Trap Bribe Corruption