कोल्हापूर – जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफ च्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी 25 जवानांची 2 पथके सज्ज झाली आहेत.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पथक प्रमुख निरीक्षक ब्रिजेशकुमार रैकवार, निरीक्षक बलबीरलाल वर्मा, उपनिरीक्षक अजयकुमार यादव यांच्याशी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती व मदतकार्याबाबत चर्चा केली. जिल्ह्यात मदतकार्य करताना या पथकाला कोणतीही अडचण आल्यास प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी एनडीआरएफ च्या जवानांना दिले. कोरोना परिस्थितीत आवश्यक ती खबरदारी घेऊन मदतकार्य करण्यासाठी पथक सज्ज असल्याचा विश्वास पथकातील निरीक्षक ब्रिजेशकुमार रैकवार यांनी व्यक्त केला.