छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजे संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूरमधील दंगल आणि अन्य प्रश्नांवर पत्रकारांशी संवाद साधला. कोल्हापूरच्या प्रकारावरुन त्यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारवर थेट निशाणा साधला.
पवार म्हणाले की, राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही.
गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे?
ओडिशा आणि काही राज्यात चर्चवर हल्ले केले जात आहेत. ख्रिश्चन समाज हा शांतताप्रिय आहे. कोणाची काही चूक असेल तर सरकारने पोलिस कारवाई करावी. मात्र तसे न करता चर्चवर हल्ले केले जात आहेत. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. ही एक विशिष्ट विचारसरणी आहे. ही विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Kolhapur Riot NCP Sharad Pawar