कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काही तरुणांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यातच आज हिंदू संघटनांचा मोर्चा होता. त्याचवेळी दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी घरे आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळेपोलिसांना लाठीमारही करावा लागला आहे. मोठ्या शर्थीनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे. शहर परिसरातील इंटरनेटही बंद करण्यात आले आहे.
काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी याविरोधात निदर्शने केली, त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यात अनेक जण जखमी झाले. मात्र, पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे. शहरातील संघटनांकडून बंद आणि आंदोलन पुकारण्यात आले होते. त्याचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे. गृह विभाग आणि मंत्री अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून मीही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मी जनतेला कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करतो.
कोल्हापूरच्या घटनेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाची स्तुती करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफी नाही. पोलिस कारवाई करत आहेत. तसेच, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून लोकांनीही शांतता राखली पाहिजे याची काळजी घेणे ही आमची सामूहिक जबाबदारी आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, काही संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली असून या संघटनांचे सदस्य बुधवारी शिवाजी चौकात जमले. त्यांची निदर्शने संपल्यानंतर जमाव पांगण्यास सुरुवात झाली, मात्र काही हल्लेखोरांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना या लोकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. आंदोलकांना शांतता राखावी आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
Kolhapur Protest Social Media Riot