कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संत ज्ञानेश्वरांनी २१ वर्षांच्या लहानशा आयुष्यात ज्ञानेश्वरी रचली, सचिन तेंडुलकरने वयाच्या पंचेविशीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करून पहिले स्थान पटकाविले होते. असे तोंडात बोटं घालायला लावणारे विक्रम आपण ऐकत, वाचत असतो. असाच एक अनोखा पराक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतीक पाटील या २३ वर्षीय तरुणाने केला आहे. या पठ्ठ्याने २३व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण करत कृषी विभागाचा उपसंचालक म्हणून कारभार हाती घेतला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील इस्पुर्ली येथील प्रतीक पाटील याने अवघ्या २३व्या वर्षी कृषी विभागाच्या उपसंचालकपदी गवसणी घातली आहे. राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रतीकने हे यश मिळवले. तळसंदे इथल्या डी वाय पाटील कृषी विद्यापीठातून बीएसस्सीची पदवी प्राप्त केलेला प्रतीक गावातील पहिलाच क्लासवन अधिकारी ठरला आहे. प्रतीकचे वडील गावचे माजी सरपंच आहेत. मात्र, प्रतीकने वडिलांच्या मागे राजकारणात न जाता प्रशासकीय सेवेत यश मिळवत एक वेगळा संदेश देखील दिला आहे.
स्वत:च्या या यशाबद्दल बोलताना प्रतीक म्हणतो,‘बारावी झाल्यानंतर ठरवले होते की, स्पर्धा परीक्षा द्यायच्या. त्यामुळे बीएसस्सी अॅग्रीसाठी प्रवेश घेतला होता. आई-वडील हेच माझे प्रेरणास्थान होते. राज्यात सहाव्या क्रमांकावर आल्याने कृषी उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली. २०२२ ला ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. एका वर्षासाठी पुण्यात गेलो. पूर्व, मुख्य आणि मुलाखत पार पडली. गावातील विद्यार्थ्यांकडे पोटेन्शीएल असते. त्यांना योग्य दिशेची गरज असते. स्पर्धा खूप वाढली आहे. काही विद्यार्थ्यांना अपयश येते. अशावेळी त्यातून सावरून त्यांनी पुढील मार्ग निवडावा.’
थोडा संयम ठेवल्यास यश शक्य
ग्रामीण भागातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना संधीदेखील आहे. थोडा संयम ठेवल्यास स्पर्धा परीक्षेत देखील यश मिळवू शकतात, असे प्रतीकने या यशानंतर म्हटले आहे. तर, शेती आणि घरचे काम सांभाळत प्रतीकने मिळवलेल्या यशाचे त्याच्या आई-वडिलांसोबत नातेवाईकांना देखील कौतुक वाटत आहे.
Kolhapur Pratik Patil Deputy Director Agriculture at Age 23 Year
Ispurli