कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक चांगलीच गाजली होती. महाडिक आणि पाटील या गटामध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. परंतु विद्यमान सत्ताधारी महाडिक गटाने पाटील गटाचा या निवडणुकीत पार धुव्वा उडवला असून पुन्हा एकदा साखर कारखान्याचे सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. महाडिक गटाने कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ जागांवर विजयी घौडदौड सुरु केली आहे.
या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आरोपांच्या फैरी झाल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर या निवडणुकीत आरोपाने कळस गाठला होता. एकमेकांना आव्हान त्याचबरोबर एकेरी उल्लेख करण्याची भाषा सुद्धा प्रचारांमध्ये दिसून आली. त्याचबरोबर हा वाद कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकापर्यंत येऊन पोहोचला होता. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होते? याकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, आता या निवडणुकीमध्ये महाडिक गटाने एकहाती सत्ता मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूकीत विजय निश्चित झाल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी आमदार अमल महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांनी पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. आता मतमोजणी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा अंतिम निकालावर औपचारिक शिक्कामोर्तब होईल.
विशेष म्हणजे निवडणुकीमध्ये कंडका पाडायचाच या घोषणेने प्रचारामध्ये उतरलेल्या विरोधी परिवर्तन आघाडीचा पुरता धुव्वा महाडिक आघाडीने उडवला. कांडका पाडणे हा उसाचे दोन तुकडे करणे या अर्थाने वापरला जातो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा पुरता बीमोड करणे असाही त्याचा अर्थ होतो. आता सर्वच्या सर्व जागांवर महाडिक आघाडीने विजयी घौडदौड सुरू केली आहे.
वास्तविक विरोधी आघाडीकडून देखील जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे महाडिकांच्या सत्तेला ओहटी लागते की काय? अशी शंका कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रामध्ये वर्तविण्यात येत होती. मात्र, पुन्हा एकदा सभासदांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सलग निवडणूक जिंकलेल्या सतेज पाटील यांना पराभव पहावा लागला आहे.
सकाळी पहिल्या फेरीमध्ये सुमारे १ हजार मतांनी सर्वच उमेदवार महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर राहिले. तिच परिस्थिती दुसऱ्या फेरीत दिसून आली. महाडिकांच्या बालेकिल्ल्यामध्ये महाडिकांना भरपूर मतदान मिळाले. हातकणंगले तालुका हा राजाराम कारखान्यासाठी निर्णायक होता. या तालुक्यामधून मोठे मताधिक्य आणि तसेच इतर मोठ्या गावांमधूनही मताधिक्य महाडिक आघाडीला मिळाले. आमदार विनायक कोरे, माने गट , आवाडे गट यांचीही साथ सत्ताधारी महाडिक गटाला मिळाल्याने विजयी होण्यास मदत झाली, असे दिसून येते.
Kolhapur Politics Rajaram Cooperative Sugar Factory Election Result