कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपण शाळेत असताना ‘मला लॉटरी लागली तर, ‘ असा एक निबंध असायचा आणि खरंच कोणाला लॉटरी लागली तर त्याचे नशीबच पालटते. सध्याच्या काळात कोण बनेगा करोडपती ? वगैरे सारख्या कार्यक्रमाची उपस्थित चर्चा होते. आणि कोणी करोडपती झाले तर मग काय विचारता? त्याच प्रकारे एखाद्याला जर अचानकपणे सोने सापडले तर! कोणालाही प्रचंड आनंद होईल, आणि इतरांना आश्चर्य वाटेल. परंतु अशी घटना खरोखर घडली आहे, परंतु म्हणतात ना ! ‘ दैव देते आणि कर्म नेते… ‘ सोने तर सापडले परंतु ते तात्काळ पोलिसांना परतही करावे लागले काय घडले नेमके?…
तळ्याकाठी सापडली पिशवी
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे त्याचे असे झाले की तळ्याकाठी काही मुले खेळत होती आणि त्यांच्या हाती एक अचानकपणे पिशवी लागली. काय होते त्या पिशवीत? तर मुलांना गवतामध्ये सापडलेल्या प्लास्टिक पिशवीत चक्क ३९४ ग्रॅम वजनाचे सोने सापडले. विशेष म्हणजे यामध्ये सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांचा समावेश आहे. त्याची बाजारभावानुसार किंमत २४ लाख २९ हजार ५०० रुपये इतकी आहे. सुमारे ३२९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट असून १० ग्रॅम वजनाची ४ सोन्याची बिस्किटे तसेच१० ग्रॅम वजनाची २ नाणी आणि५ ग्रॅम वजनाचे एक नाणे असा ऐवज होता. मात्र पोलिसांना सुगावा लागताच त्यांनी ती ताब्यात घेतली. संबंधित सोन्यावर अद्याप कोणीही हक्क दाखविण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे बेवारस सापडलेले सोने कोणाचे, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
खरा मालक कोण?
पोलिसांनी त्या कुटुंबाच्या ताब्यातून सारा ऐवज ताब्यात घेतला असून याची गांधीनगर पोलिस ठाण्यात त्याची नोंद केली. तसेच त्यानंतर याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गावानजिक तळ्याजवळ सायंकाळच्या सुमारास रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही लहान मुले खेळत होती. त्यांना गवतात प्लास्टिकची पिशवी सापडली. त्यात सोनेरी चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी होती. त्यांनी पिशवी तशीच गावातीलच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली; पण तळ्याकाठी सोन्याची बिस्किटे आणि नाणी याची चर्चा गावात सुरू झाली. त्याची चाहूल गांधीनगर पोलिसांना लागताच त्यांनी याचा गोपनीय तपास करत विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. त्याच्याकडे सखोल चौकशी करताना सोने सापडल्याचे सत्य उघड झाले. त्यानंतर पोलीसांनी या प्रकरणाचा नेमका खुलासा केला. परंतु महत्वाचे म्हणजे सापडलेले हे सर्व सोने खरे आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी गांधीनगर येथील एका ज्वेलरी दुकानातून तपासणी केली. त्यावेळी सोने खरे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची असावीत, याची सर्वत्र चर्चा सुरू असून सध्या तरी हे सोने माझेच किंवा आपलेच आहे असे सांगणाऱ्या सोन्याचा मालक अद्याप पुढे आलेला नाही त्यामुळे चोरीचा हा मामला अद्यापही चर्चेतच आहे.