कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हटले जाते. कारण आईच असते जी जन्म देण्यापासून समज येईपर्यंत आणि चार लेकरांचा बाप झाल्यानंतरही माया करतच असते. कोल्हापुरातील एका मुलाने आईच्या अंत्ययात्रेत ‘सोडुनिया आई गेली आम्हा लेकरांना… आई आई आता म्हणावे कुणाला’ अशी हाक दिली आणि साऱ्यांनाच गहिवरून आले.
ही कहाणी जरा वेगळी आहे. कारण ती आई आणि मुलाच्या प्रेमाचे एक वेगळेच उदाहरण सांगणारी आहे. कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती पाटील यांच्या आईचे (भागिरथी पाटील) दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्या बरेच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होता. अखेर वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. पण मारोती यांनी आईच्या अंत्ययात्रेची तयारी आधीच करून ठेवली होती. हे ऐकायला जरा विचित्र वाटत असले तरीही त्याला कारणही तसेच होते.
आई आपल्याला सोडून जाणार आहे, हे त्यांना ठावूक झाले होते. डॉक्टरही त्यांच्यावर उपचार करत होते. पण आशा कमीच होती. अशात त्यांनी आईच्या अंत्ययात्रेसाठी खास पालखी तयार करून घ्यायला सुरुवात केली. अंत्ययात्रेच्या दिवशी पालखी पाना-फुलांनी सजली होती. टाळ मृदंगाचा गजर सुरू होता. अशा अत्यंत आल्हाददायक वातावरणात मारोती पाटील यांनी आईची अंत्ययात्रा काढली. आईचा शेवटचा प्रवास छान व्हावा, या उद्देशाने त्यांनी हे सारे केले.
आईची सेवा केली
आईने एवढं धडधाकट शरीर दिलं, प्रेम दिलं, आपल्याला हवं ते देण्यासाठी जीवाचं रान केलं, याची जाणीव ठेवून मारोती पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी सेवा केली. प्रकृती खराब असताना, उपचार सुरू असताना पूर्णवेळ आईच्या पायाशी बसून त्यांनी आईची काळजी घेतली आणि सेवा केली. आईला काहीही कमी पडू दले नाही.
Kolhapur Mother Death Cremation Palkhi Decorated