कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मागचा ईडीचा तगादा अद्याप संपलेला नाही. गेल्या महिन्यात त्यांच्या घरावर छापेमारी करणारी ईडी आज त्यांच्या कोल्हापूर येथील बँकेत पोहोचली. कोल्हापूर जिल्हा बँक हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असून आज मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेचा ताबा घेतला होता.
मुश्रीफ यांच्या कागल, पुणे आणि मुंबई येथील घरांवर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर मुश्रीफ यांच्या अडचणींमध्ये वाढ होत राहणार हे निश्चित होते. ११ जानेवारीनंतर बरोब्बर २१ दिवसांनी पुन्हा एकदा ईडीने त्यांना दणका दिला. कोल्हापूर जिल्हा बँकेसह कागल येथील सेनापती कापशीच्या शाखेमध्येही ईडीचे अधिकारी पोहोचले. गेल्या महिन्याच्या छापेमारीत केवळ मुश्रीफच नाही तर त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या घरी, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा कारखाना आणि इतर काही ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. कोल्हापूर येथील सासणे मैदान परिसरात मुश्रीफ यांच्या मुलीचे घर आहे. तिथेही ईडीचे अधिकारी पोहोचले होते. कोल्हापूर जिल्हा बँकेतील छापेमारीनंतर जिल्ह्यातील राजकारण तापले निघाले आहे. कागल तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
सोमय्यांच्या भेटीने, की?
किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुश्रीफ यांच्या घरी धाड पडली होती. त्यामुळे बरीच चर्चा रंगली होती. ही कारवाई भाजप जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्या इशाऱ्याने झाल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या पहिल्या छाप्यांनंतर सोमय्या कोल्हापुरात का येऊन गेले, याचीही चर्चा होत आहे.
बंद कंपन्यांच्या खात्यात ५० कोटी!
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंद पडलेल्या दोन कंपन्यांच्या खात्यात ५० कोटी रुपये कॅश भरले आणि त्यानंतर तेच पैसे साखर कारखान्यांच्या खात्यात वळते केले. यात पश्चिम बंगालमधील काही शेल कंपन्यांचा वापर करून काळा पैसा आपल्या खात्यात वळविल्याचा आरोप ईडीने केला आहे.
Kolhapur District Bank Branches ED Raid Hasan Mushrif