कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ई वॉर्ड पितळी गणपती जवळील एम्पायर टॉवर इमारतीमध्ये महापालिकेची पहिली ई-लायब्ररी सुरु करण्यात आली आहे. या लायब्ररीचे लोकार्पण पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उप-आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता नारायण भोसले, रमेश कांबळे, सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, ग्रंथपाल रत्नाकर जाधव उपस्थित होते.
ही लायब्ररी महासर्वसमावेशक आरक्षणाच्या माध्यमातून महापालिकेच्या ताब्यात विकासकाकडून प्राप्त झालेल्या ई वॉर्ड पितळी गणपती जवळील एम्पायर टॉवर इमारतीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. शहरात स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात असून बऱ्याच विद्यार्थ्यांना पुणे येथे अथवा कोल्हापूरातील खासगी अभ्यासिकेचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सर्वसामान्य कुंटुबातील विद्यार्थ्यांना अर्थिकदृष्टया खाजगी लायब्ररीमध्ये जाणे शक्य होत नाही.
अशा विद्यार्थ्यांना माफक दरामध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर महानगरपालिकेने हि लायब्ररी तयार केली आहे. यासाठी महापालिका स्वनिधीतून रु.१३ लाख २१ हजार ६०६ रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे. या लायब्ररीची एकाच वेळेस ४० विद्यार्थी अभ्यास करू शकतील इतकी क्षमता आहे.
याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वाय-फाय सुविधा, ए.सी रुम अशी अद्यावत ई लायब्ररी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांचे उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या लायब्ररीचा उपयोग हाईल.
Kolhapur City First E Library Started