कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने मे 2023 च्या पहिल्या आठवड्यात थेट पाईपलाईनने शहराला पाणीपुरवठा उपलब्ध करुन देण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदीवडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून अधिक गतीने काम पूर्ण करुन घ्यावे. या कामात कोणीही अडवणूक केल्यास पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. हे काम कोणत्याही परिस्थितीत पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करुन यातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्याबाबत योग्य ती दक्षता महापालिकेने घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
कोल्हापूर शहराला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आणण्यासाठी पर्यटन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील भक्तनिवास व बायोटॉयलेटची कामेही तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत. तसेच पंचगंगा नदीतील पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका व जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या किती गावांमधून प्रदूषित पाणी पंचगंगा नदीत जाते याबाबतचा आराखडा तयार करावा. सेफ्टी टॅंक व बायोटॉयलेटचा वापर करुन प्रदूषित पाणी नदीत जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे श्री. केसरकर यांनी सुचित केले.
धरणातून पाणी सोडत असताना नदीच्या दोन्ही बाजूंची वीज बंद राहील याबाबत जलसंपदा विभागाने महावितरण विभागाशी चर्चा करुन नियोजन करावे. जेणेकरुन पाणी उपसा होणार नाही व पिण्याचे पाणी शंभर टक्के त्या त्या गावांसाठी उपलब्ध होईल, असे श्री. केसरकर यांनी सूचित केले.
जिल्हा नियोजन समितीकडून विकास कामासाठी ज्या यंत्रणांना निधी उपलब्ध झालेला आहे व तो निधी या आर्थिक वर्षात खर्च करण्याबाबत त्यांनी नियोजन केलेले आहे, अशा सर्व विभागांनी तो निधी माहे मे 2023 अखेर मंजूर विकास कामावर 100 टक्के खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिले. जिल्हा नियोजन समितीकडून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मंजूर केलेला असतो. मंजूर झालेला निधी विहित वेळेत खर्च न होणे ही गंभीर बाब असल्याने कोणत्याही विभागाने पुढील काळात निधी अखर्चीत ठेवू नये, असेही त्यांनी निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी उपरोक्त सूचनाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.
Kolhapur City Direct Pipeline Water Supply Deadline