कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. भाजपचे सत्यजित कदम आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्यापैकी कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून राज्यातील नेत्यांच्या अनेक सभा, मेळावे आणि बैठका झाल्या. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचेच असल्याने आता त्यांचीही प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीतील सभांमध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याची चर्चाही झडली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता राज्यामध्ये आहे.
आज सकाळीच मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत १८ फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत. त्यानुसार, महाविकास आघाडीच्या जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. जाधव यांनी तब्बल १३ हजार ८५५ मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. थोड्याच वेळात या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे.