कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा दणदणीत वीजय झाला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा जाधव यांनी तब्बल १८ हजार ९०१ धावांनी पराभव केला आहे.
भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली. त्यामुळेच भाजपच्या केंद्रीय नेत्यांपासून राज्यातील नेत्यांच्या अनेक सभा, मेळावे आणि बैठका झाल्या. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचेच असल्याने आता त्यांचीही प्रतिष्ठा या पोटनिवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीतील सभांमध्ये भाजपने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याची चर्चाही झडली. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागणार, याची उत्सुकता राज्यामध्ये होती.
आज सकाळीच मतमोजणी सुरू झाली. जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. ती त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. जाधव यांनी तब्बल १३ हजार मतांपेक्षा अधिक आघाडी घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला. काही वेळातच त्यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. या विजयानंतर काँग्रेस सह महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वागत केले आहे. जनताच योग्य न्याय करते, जातीयवादी शक्तींना हा दणका आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कोल्हापूरमधून प्रथमच महिला आमदार विधिमंडळात जाणार आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1515238554640990209?s=20&t=BxS4Tfr252NE3xzU49F3Ig
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना 19 हजार 307 मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक नारायण स्वामी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना कापसे, संतोष कणसे, रंजना बिचकर आदी उपस्थित होते.
विजयी उमेदवार श्रीमती जाधव यांना प्रमाणपत्र देतेवेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्यासह अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री जाधव यांना 97 हजार 332 तर भारतीय जनता पार्टी या पक्षाचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना 78 हजार 25 इतकी मते मिळाली.
उमेदवार, पक्ष आणि मिळालेली मते खालीलप्रमाणे-
अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
1 जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा) इंडियन नॅशनल काँग्रेस 97332
2 सत्यजीत (नाना) कदम भारतीय जनता पार्टी 78025
3 यशवंत कृष्णा शेळके नॅशनल सोशालिस्ट पार्टी (युनायटेड) 326
4 विजय शामराव केसरकर लोकराज्य जनता पार्टी 165
5 शाहीद शहाजान शेख वंचित बहुजन आघाडी 469
6 देसाई सुभाष वैजू अपक्ष 98
7 बाजीराव सदाशिव नाईक अपक्ष 66
8 भोसले भारत संभाजी अपक्ष 43
9 मनिषा मनोहर कारंडे अपक्ष 49
10 माने अरविंद भिवा अपक्ष 58
11 मुस्ताक अजीज मुल्ला अपक्ष 96
12 मुंडे करुणा धनंजय अपक्ष 134
13 राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक अपक्ष 114
14 राजेश सदाशिव कांबळे अपक्ष 111
15 संजय भिकाजी मागाडे अपक्ष 233
16 नोटा – 1799
17 रिजेक्टेड – 36