कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर येथील अंबाबाईच्या मूर्तीशी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी छेडछाड केल्याचा आरोप पूजकांनी केला आहे. यासंदर्भात देवीच्या मूर्तीची दोन छायाचित्रे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत.
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड केल्याचा आरोप झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाची ही टीम खरे तर पाहणी करण्यासाठी आली होती. मात्र पाहणी करताना अधिकाऱ्यांनी मूर्तीच्या लेपचा काही थर काढून टाकला. त्यामुळे मूर्तीचा चेहरा आणखीनच खराब झाला, असा आरोप पूजकांनी केला आहे.
अंबाबाईच्या देवळातील पूजकांच्या आरोपांनंतर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर आज सुनावणी झाली. पूजक गजानन मुनीश्वर यांनी मूर्ती संवर्धन प्रक्रियेबाबत कोल्हापूर सत्र न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पुरातत्व विभागावर गंभीर आरोप केले. पाहणी करताना अधिकाऱ्यांनी मूर्तीला छेडछाड केल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा दावा पूजकांनी केला. यावरून आता मोठा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत.
म्हणून केंद्राचे पथक
२८ फेब्रुवारीला राज्य पुरातत्व विभागाकडून अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. मूर्तीची काही प्रमाणात झाज झाल्यामुळे ही पाहणी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय पुरातत्व विभागाला पाहणी अहवाल पाठविण्यात आला. त्यामुळे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी मंदिराला भेट देऊन पुन्हा पाहणी केली.
मूर्ती सुरक्षित
केंद्रीय पुरातत्त्व विभाग लवकरच पाहणी अहवाल सादर करणार आहे. या अहवालानंतर संवर्धनासंदर्भात पुढील निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु, सद्यस्थितीत मूर्ती सुरक्षित असून काही प्रमाणात संवर्धनाची गरज भासल्यास त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाने दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Kolhapur Ambabai Idol Archeology Department