नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर विमानतळावर प्रवाशांच्या वर्दळीत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या परिसरात वाढीव क्षमतेसाठी विमानतळ विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या विकास प्रकल्पात, नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, सध्याच्या धावपट्टीचे मजबुतीकरण, धावपट्टीचा विस्तार, नव्या एप्रन तसेच विलगीकरण विभागाची उभारणी या कामांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या उडान उपक्रमाअंतर्गत आरसीएस अर्थात प्रादेशिक जोडणी योजनेतील विमानतळ यासाठी कोल्हापूर विमानतळाची निवड करण्यात आली असून सध्या येथून विमानाने हैदराबाद, बेंगळूरू, मुंबई आणि तिरुपती येथे जाता येते. नुकतीच या विमानतळाला अहोरात्र विमानोड्डाण करण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यात आली आहे.
येथील नवी टर्मिनल इमारत सुमारे 4000 चौरस मीटर परिसरात विस्तारलेली असून अतिशय वर्दळीच्या वेळी 300 प्रवाशांसाठी आवश्यक प्रक्रिया हाताळणे शक्य होणार आहे. या टर्मिनलमध्ये 10 चेक-इन काउंटर्ससह प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा असतील. या इमारतीला शाश्वत सुविधांसह उर्जा बचत करणाऱ्या इमारतींच्या ‘गृह’ या मानदंडानुसार चार तारांकित दर्जा मिळालेला आहे. टर्मिनल इमारतीच्या अंतर्भागात स्थानिक संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडविणाऱ्या कला आणि संस्कृतीचा प्रभाव दिसून येईल. कोल्हापूर परिसरातील महाराजा राजवाडा, भवानी मंडप तसेच कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला यांसारख्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वास्तूंचा प्रभाव असलेल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन उभारण्यात आलेल्या मोठ्या कमानी नव्या टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावर बसविण्यात आल्या आहेत.
टर्मिनल इमारतीच्या विस्ताराचे 60% हून अधिक काम पूर्ण झाले असून ही इमारत 31 मार्च 2023 पर्यंत सज्ज होईल. एअरसाईड सुविधांच्या अद्यायावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय, येथे आगामी काळात वाढणाऱ्या हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी नव्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची देखील उभारणी करण्यात येत आहे. या विमानतळ परिसरात 110 गाड्या तसेच 10 बस थांबू शकतील अशी पार्किंग व्यवस्था करणे हा देखील येथील विकास कामांचा भाग आहे.
कोल्हापूर शहर पंचगंगा नदीच्या काठी वसलेले असून सह्याद्रीच्या डोंगररांगाने वेढलेले आहे. कोल्हापूर हे शहर ऐतिहासिक किल्ले, मंदिरे आणि पूर्वीच्या काळच्या शाही राजवाडे यासाठी प्रसिध्द आहे. कोल्हापूर हा महाराष्ट्र राज्यातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने सर्वात प्रगत जिल्ह्यांपैकी एक असून कृषी आधारित उद्योगांच्या बाबतीत आघाडीवर असलेला जिल्हा आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील वस्तू, शुद्ध साखर तसेच कापड यांच्या उत्पादनाच्या बाबतीत देखील हा जिल्हा अग्रेसर आहे.
जागतिक दर्जाच्या या नव्या इमारतीमुळे हे औद्योगिक शहर अधिक उत्तम प्रकारे इतर भागांशी जोडले जाईल आणि त्यामुळे या भागातील पर्यटन उद्योगाला चालना मिळेल. कोल्हापूरसाठी कनेक्टीव्हिटी वाढल्याने स्थानिक समाजाला नव्या रोजगार संधी उपलब्ध होतीलच, त्याचबरोबर त्यांना अधिक चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळू लागतील.
Kolhapur Airport Development Facilities
Runway Terminal Passenger