कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मिडियावर लोक सतत तत्वज्ञान पाजळत असतात. स्वतःचा फोटो आणि त्यावर एक छानसा सुविचार असे पोस्टर नित्यनेमाने टाकत असतात. पण प्रत्यक्षात ती व्यक्ती एवढी सुविचारी आहे का, हे कुणालाच माहिती नसतं. असाच एक सोशल मिडियावरील ‘तत्वनिष्ठ’ फौजदार लाच घेताना सापडल्यामुळे त्याची चांगलीच चर्चा होत आहे.
‘८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाच जीव उपाशी राहात नाही. आणि माणूस पैसे कमावून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही?’ अशी पोस्ट पाच महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर टाकणारा जयसिंगपूर (कोल्हापूर) पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार १० हजार रुपयांची लाच घेताना सापडला आहे. सोमनाथ देवराम चळचूक असे या फौजदाराचे नाव आहे. त्याने फायनान्समध्ये जप्त झालेले वाहन परत मिळवून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु, तक्रारदाराने फौजदाराच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानंतर विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून फौजदाराला १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेमुळे कोल्हापूर पोलिसांमधील वाढत्या भ्रष्टाचाराची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे संबंधित फौजदाराची डिसेंबर २०२२ मधील पोस्टही व्हायरल होत आहे. या पोस्टसोबत त्याची खिल्ली उडविली जात आहे. हा लाचखोर पोलीस फेसबुकवर काय पोस्ट करतो आणि प्रत्यक्षात काय करतो बघा… या शब्दांमध्ये ट्रोल केले जात आहे.
एक प्रकरण अद्याप ताजे
मार्चमध्ये कोल्हापूर पोलिसांत घडलेल्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या असताना आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आले आहे. कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील एपीआय आणि कॉन्स्टेबलला ८ लाख रुपयांची लाच घेताना पकडले होते. सांगली आणि कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकांनी मध्यरात्रीनंतर अडिच वाजता रंगेहाथ पकडले होते.
Kolhapur ACB Raid Police Bribe Corruption Trap