कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही दसरा महोत्सवातून जगभर पोहोचेल, असे प्रतिपादन पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी केले. ऐतिहासिक भवानी मंडप परिसरात पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित शाही दसरा महोत्सव २०२४ च्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, देश आणि जगभरातून आलेल्या पर्यटकांना विजयादशमीचे महत्त्व कळावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरची वैशिष्ट्ये लोकांना पाहण्याची सुवर्ण संधी यातून मिळेल. या उद्घाटन कार्यक्रमावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अति.आयुक्त महापालिका राहूल रोकडे, पश्चिम देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, मधुरीमाराजे छत्रपती, पर्यटन समितीचे सर्व सन्मानिय सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी येणारे १० दिवस सर्व जिल्हावासियांना भक्तीभावाचे जावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले, येणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना प्रशासनाकडून चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. संपूर्ण नवरात्रोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले असून नागरिक तसेच पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज
येणाऱ्या नवरात्रोत्सवाबाबत सर्वांना छत्रपती शाहू महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, येणारा उत्सव भक्तीभावाने साजरा करून तो खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत. उत्सव सर्वत्र पोहोचण्यासाठी काम करावे. शेकडो वर्षांपासून हा दसरा महोत्सव सुरू आहे. त्यामध्ये दरवर्षी नवनवीन कार्यक्रमांचा समावेश केल्याने त्याला नाविन्यता मिळत आहे. दर्शन सुविधाही अधिक चांगल्या केलेल्या असून प्रशासनाकडून चांगले काम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले.
कोल्हापूरच्या दसऱ्याला ऐतिहासिक महत्व असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी रिमोटची कळ दाबून शाही दसरा महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेन राजाराम हायस्कूल इमारतीमध्ये भरविण्यात आलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती शाहू महाराज आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. तर शिवाजी विद्यापीठ व शासकीय मुद्रणालया मार्फत भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हयातील एतिहासिक परंपरा सांगणाऱ्या चित्रफितीचे अनावरनही करण्यात आले.
असे असतील शाही दसरा महोत्सवामध्ये कार्यक्रम
पहिल्या दिवशी भवानी मंडप परिसर येथे दसरा महोत्सवाचे उद्घाटन आणि मेन राजाराम हायस्कूल, भवानी मंडप येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरीत दुर्मिळ पत्रसंग्रहाच्या प्रदर्शनाचे व ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील नागरिक, तसेच शाळा, महाविद्यालये व शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून पांरपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. दिनांक 5 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप परिसरात “महाराष्ट्राची शक्तीपीठे” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी भवानी मंडप परिसर येथे 10 पथकांचे युध्दकला प्रात्यक्षिक सादरीकरण. त्याचबरोबर भवानी मंडप परिसरात सायंकाळी 5 वाजता “गौरव माय मराठीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता विविध क्षेत्रातील महिलांच्या सहभागातून “नवदुर्गा बाईक रॅली’ चे आयोजन केले आहे. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता भवानी मंडप परिसर येथे पोलीस कर्मचारी बँड, मिलीटरी कर्मचारी बँड, शाळांचे व इतर नामवंत पथकांचे बँड वादन आयोजित केले आहे. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयावर आधारीत निबंध स्पर्धा, दिनांक 11 ऑक्टोबर रोजी श्री अंबाबाई देवीच्या नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन, दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक या मार्गावर दसऱ्यानिमित्त शाही स्वारीचे आयोजन केले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, ढोलवादन पथके, लेझीम पथके, झांज पथक, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे, मर्दानी खेळाची पथके, मल्लखांब पथके, 11 घोड्यांसमवेत 11 मावळे, 10 मावळे-अब्दागिरीसह यांचा समावेश असणार आहे. तसेच न्यू पॅलेस ते दसरा चौक या मार्गावरुन 150 बुलेटस्वार, पोलीस एस्कॉर्ट व छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. या रॅली दरम्यान एन एस एस, एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी या स्वारीला मानवंदना देतील. याशिवाय जिल्हा परिषदेच्या वतीने व शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य कार्यक्रमांचे नियोजन होणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे उपस्थित होते.