इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया करु, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असे कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. तर दुसरीकडे वनताराचे सीईओ यांनी देखील मठातील हत्तीणला वनतारामध्ये नेण्यासाठी आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झाले ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झाल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश आले तर वनताराकडून माधुरी हत्तीण परत देण्यात येईल.
शुक्रवारी वनताराचे सीईओ, नांदणी मठाचे मठाधीपती व महत्त्वाचे नेते यांच्यात बैठक झाली. त्यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनजंय महाडिक उपस्थित होते. ही बैठक कोल्हापूरमध्ये हत्तीण परत आणण्यासाठी मोहित सुरु झाल्यानंतर झाली.
दरम्यान आ. रोहित पवार यांनी कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीण केवळ प्राणी नसून कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा, परंपरेचा आणि अस्मितेचा विषय आहे. न्यायालयात समोरच्या बलाढ्य पार्टी विरुद्ध बाजू मांडण्यासाठी मठाकडे मोठे वकील नव्हते. पण जनता मात्र मठाच्या बाजूने आहे.
परंपरा, जनभावना आणि अस्मिता या अत्यंत महत्वाच्या असतात, परंतु कोल्हापूरच्या महादेवी हत्तीण प्रकरणात मात्र परंपरा, जनभावना आणि अस्मितेलाच पायदळी तुडवण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित मोठ्या कुटुंबाने देखील मराठी माणसांच्या अस्मितेचा आदर ठेवावा आणि हा आदर ठेवला जाईल ही अपेक्षा. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हा विषय मार्गी लावावा, ही विनंती! असे म्हटले आहे.