कोल्हापूर – आईवर रॉकेल ओतून जिवंत जाळल्या प्रकरणी तीन वर्षाच्या मुलीने न्यायालयात दिलेली साक्ष व आईने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबमुळे कोर्टाने तिघांना शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने तीन वर्षाच्या या मुलीची साक्षही ग्राह्य धरली. मुलगा होत नसल्याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याप्रकरणी हा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. यात पतीसह सासू आणि सासर्याला शिक्षा सुनावली आहे. मयत पत्नीच्या अवघ्या तीन वर्षाच्या मुलीने न्यायालयात काय घडले याचा थरार कोर्टात सांगितला.
अल्ताफ बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख (पती), सरदारबी बुढेलाल ऊर्फ दादेसाब चमनशेख (सासू) आणि बुढेलाल ऊर्फ दादेसाब जिनासाब चमनशेख (सासरा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपी मूळचे बेळगाव जिल्ह्यातील कुडची येथील रहिवासी असून सध्या कोल्हापुरच्या उचगाव येथे वास्तव्याला होते. या प्रकरणी पत्नी शाहिस्ता चमनशेख यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही तक्रार व मुलीची साक्ष या निकालात महत्वपूर्ण ठरली.
तुला केवळ मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून हे तिघे महिलेवर अत्याचार करत होते. यांनीच या महिलेला जिवंत जाळले. न्यायालयाने पतीसह सासूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सासर्यालाही तुरुंगवास झाला आहे. साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने नऊ वर्षानंतर आरोपींना ही शिक्षा सुनावली आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दिला आहे.