कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक समितीतर्फे हा निर्णय घेण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीसाठी केलेल्या नियुक्त्यांनुसार भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. प्रदेशाकडून निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक आणि निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून महेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक संचालन समिती नियुक्त करण्याचे अधिकार या तीन नेत्यांना देण्यात आले आहेत.