इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिक दौ-यावर असतांना केलेल्या एका विधानावर आता राज्यभर टीका सुरु झाली आहे. या दौ-यात एका शेतक-यांनी त्यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ते चांगलेच संतापले. त्यांनी उलट शेतक-यांनाच सुनावलं आहे. पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता. तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जाच्या पैशांमधून लग्न, साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी या शेतक-यांना सुनावलं. त्यानंतर या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. दरम्यान या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वटेड्डीवार यांनी जोरदार टीका केली आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना कृषीमंत्री असंवेदनशीलपणे वागत आहेत. राज्यात विदर्भ,मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे.
हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे. बहुमत मिळाल्याने कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडलं आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही. राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.