रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाढत्या लोकसंख्येसोबतच गावांचा विस्तार वाढतो आहे. नागरीकरणही झपाट्याने सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही वाढतो आहे. त्यातूनच घरपट्टी, पाणीपट्टीती वसुली रखडते. थकबाकी वाढत जाते. त्याचा थेट परिणाम विकासकामांवर देखील होतो. यावर उपाय म्हणून रायगड जिल्ह्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अमृत ग्राम डिजिटल कर प्रणाली’च्या मदतीने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाणार आहे. प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करून स्वतंत्र क्यूआर कोड बनविण्यात आले असून ते घरावर लावण्यात येणार आहे.
सरपंच स्वाती पाटील यांच्या हस्ते मंगळवारी अनौपचारिकपणे ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. यावेळी त्या म्हणाल्या, ‘ग्रामपंचायत कर्मचारी पाणी आणि घरपट्टी घरोघरी जाऊन वसूल करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. अनेक वेळा वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाती परत यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी प्रियदर्शनी पाटील, मीनल माळी, उपसरपंच प्रणिता म्हात्रे, सदस्य यतीन घरत, ममता मानकर, रोहन पाटील, ग्रामविकास अधिकारी नीलेश गावंड, ललित कदम, नीलेश सावर्डेकर, देवेश गवस, स्नेहल मोरे उपस्थित होते.
राज्यातील पहिली ग्रामपंचायत
पाणीपट्टी व घरपट्टीचे मापन आणि ऑनलाईन करवसुली कार्यान्वित करणारी चेंढरे ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. चेंढरे गावाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना वसुली करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच शंभर टक्के करवसुली न झाल्याने गावाचा विकास साधता येत नाही. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी हायटेक संसाधनाचा उपयोग करण्यात आला आहे.
अशी आहे प्रणाली
घराच्या दरवाजासमोर घर क्रमांकाच्या बिल्ल्याऐवजी क्यूआर कोडचे लेबल लावले जाणार आहे. यातून ग्रामपंचायत कर्मचारी क्यूआर कोड स्कॅन करून घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करू शकतो. सर्व खातेदारांचा डेटा अचूकपणे अपडेट ठेवला जाईल.
Kokan Chendhare Grampanchayat Tax Collection Initiative