कोजागिरी पोर्णिमा
कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा, आश्विन पौर्णिमा, राज पूर्णिमा अशा विविध नावांनी ओळखली जाते. चार महिन्याच्या पावसाळी ढगाळ वातावरणानंतर प्रथमच शरद पौर्णिमेला रात्री आकाशात शरीर व मनाला शितल करणारे अल्हाददायक असे पूर्ण चंद्र दर्शन होत असते. याच दिवसाचे महत्त्व आपण जाणून घेणार आहोत.
- पंडित दिनेश पंत
आपले सर्व सणवार हे निसर्गचक्र आणि निसर्ग विज्ञान यावर आधारित आहेत. त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक, वैज्ञानिक असे दोन्ही महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी व पुत्र कुबेर यांचे पूजनास विशेष महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी युक्त असतो. म्हणून या दिवशी मध्यरात्रीनंतर चंद्र किरणांमध्ये विशेष अशी शीतलता असते. ही शितल चंद्रकिरणे अंगावर तसेच अन्नपदार्थांवर घेणे, शारीरिक व मानसिक स्वास्थासाठी विशेष फलदायी असते अशी पूर्वापार श्रद्धा आहे. या मध्यरात्री चंद्र प्रकाशात आटवलेले दूध, खीर त्यांचा लक्ष्मी व कुबेर यांना नैवेद्य दाखविणे आणि असे दूध व खिरीचे प्राशन करण्यास विशेष महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीपर्यंत जागरण करणे, त्यानिमित्त गाण्याच्या भेंड्या, भजन, गप्पा-गोष्टी, करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे. तसेच उशिरापर्यंत या कार्यक्रमानंतर दूध व खीर याचा आनंद घेतला जातो.
यंदा 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ तर 20 ऑक्टोंबर रोजी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्ती आहे.
सर्व वाचकांना कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा.