इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पतींचे महत्त्व –
भाग १ — मोहरी
आपल्या भारतात असेतू हिमाचल स्वयंपाक घरात विविध वनस्पतींची रेलचेल असते. स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण त्यात वापरायचे सर्वसाधारण घटक तेच असतात. उदा. जिरे, मोहरी, खोबरे, तिखट, हळद वगैरे. त्यांचा सूक्ष्म विचार केला तर त्यावर असणारा आयुर्वेदाचा प्रभाव आपल्याला स्पष्ट जाणवेल. त्या सर्व घटकांची शास्त्रीय माहिती या सदरातून आपण करून घेऊ या. आज आपण मोहरी विषयी जाणून घेऊया…
मोहरी (लॅटिन नाव -Brassica juncea)
आपल्या स्वयंपाकघरातील तिखटमीठाच्या डब्यात मोहरी असतेच.आपण तिचा उपयोग फोडणीसाठी करतो. , हिंदीमध्ये मध्ये तोच तडका होतो. संपूर्ण भारतभर तसेच जगातही मोहरी वापरली जाते.
कसे असते मोहोरीचे झाड :-
मोहोरीचे झाड साधारण १ मिटर उंचीचे असते. तिला पिवळी फुले येतात.मोहरीच्या वाळलेल्या बिया स्वयंपाकात वापरतात,तर पाने भाजी करण्यासाठी.पंजाब,उत्तर भारतात सरसोंका साग प्रसिद्ध आहे.
मोहरीचे बीयांच्या रंगावरून तीन प्रकार पडतात. काळी, पांढरी, काळपट लाल आणि लाल .भारतात काळपट लाल मोहरी सर्वसाधारण पणे स्वयंपाकात वापरली जाते. पांढरी मोहरी जास्त करून औषधात वापरली जाते.मोहरी गुणाने उष्ण,तिखट,कडू तसेच स्निग्ध म्हणजेच तेलकट आहे. मोहरीचे तेल खाण्यासाठी, अंगाला लावायला वापरतात. मोहरी उष्ण असल्यानेआपण फोडणीत टाकतो तेवढीच खावी.
फायदे:-
मोहरी त्वचारोग नष्ट करून त्वचेचा रंग सुधारते. काही रोगांत प्लीहा वाढते,ती वाढ मोहरी कमी करते.
दातांतून पू, रक्त येत असल्यास मोहरीचे तेल व सैंधव मीठ त्यावर चोळावे. जुनाट किंवा नवीन आवेत मोहरीचे अखंड बी पाण्याबरोबर गिळायला दिल्यास ते आव कमी करते. जंतुघ्न ( anti inflammatory)म्हणून तिचा उपयोग होतो. सूजेवर मोहरीचा पाण्यात वाटून केलेला लेप करतात.फुप्फुसकोषांची सूज ,श्वासनलिकेची सूज यांवर पण हा लेप लावतात. मोहरीचा लेप त्वचेवर फारतर १ तास ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवून पुसून घ्यावा .संशोधनात मोहरी कॅन्सर सेल्सची वाढ कमी करण्यास मदत करते ,असे आढळून आले आहे.
मोहरी पाचक आहे. पदार्थांची चव वाढवण्यास ती मदत करते. पोटफुगी कमी करते. शरीरात कृमी होऊ देत नाही. मोहरीत शरीराला आवश्यक अनेक घटक द्रव्ये असतात, उदा.ॲन्टीअॅाक्सिडंटस्,फायबर्स,सेलेनीयम,मॅग्नेशिअम,ग्लुकोसिनोलेटस् इ. ही सर्व द्रव्ये मोहरीवरील कठीण कवच फुटल्यावरच उपयोगी पडतात. म्हणून भारतात ती फोडणीत तडतडू देतात. लोणच्यात तिची डाळ वापरतात.परदेशात पण मस्टर्ड सॅास,मेयॅानीज मस्टर्ड असेच वापरतात.
मोहोरीचे तेलही खूपच उपयुक्त आहे. भारतातील पंजाब , उत्तरप्रदेश , बंगालचा काही भाग येथे हे तेल स्वयंपाकासाठी तसेच अंगाला लावायला पण वापरले जाते. हा प्रदेश महाराष्ट्राच्या तुलनेत थंड असल्याने तेथील लोकांना ते सहन होते .परंतु महाराष्ट्रात याचा त्रास होऊ शकतो.यामुळे पित्त वाढू शकते, जळजळ ,डोकेदुखी होऊ शकते. पित्तप्रकृतीच्या व्यक्तींच्या त्वचेलापण या तेलाच्या अतिवापराने त्रास होऊ शकतो. परंतु या तेलाने त्वचेची खाज कमी होते.संधीवाताची सूज, दुखणे कमी होते.
मोहरीच्या पानांत कॅल्शियम , कॅापर , व्हिट्यामिन C, A, K असते. आयुर्वेदाच्या ग्रंथात तर मोहरीच्या पानांची भाजी प्रकृती साठी चांगली नाही असे सांगितले आहे. अगदी क्वचितच ती खावी.तसेच थंड प्रदेशात ती खाण्यात असेल तर फायद्याची ठरते.
मोहोरीचे तेल कोणी खाऊ नये?
पित्त प्रकृतीच्या लोकांनी, वंध्यत्वाची समस्या असलेल्यांनी,नाकातून तसेच संडासवाटे रक्त येणे हा त्रास असलेल्यांनी , डोळ्यांच्या तक्रारी असलेल्यांनी मोहरीचे तेल नेहमी खाऊ नये.
कैरी व मोहरी हे एकत्र फार वापरले जाते. उदा. कैरीची निरनिराळ्या प्रकारची लोणची. यात मोहरीची दाळ वापरतात.
पारंपरिक लोणचे सर्वांना माहित आहे. त्याची एक वेगळी रेसिपी आपण बघू.
ऊकडआंबा :-
साहित्य – चांगल्या बाठ तयार झालेल्या पण आकाराने छोट्या ५-६ कैऱ्या , मोहरीची डाळ अर्धी वाटी. गूळ २ वाट्या , मीठ २ चमचे.पाणी अर्धी वाटी.जीरपूड १ चमचा,पाव चमचा मेथी पूड,अर्धा चमचा हिंग पूड
कृती:- प्रथम कैऱ्या वाफवून गार करून घ्या.पाणी घालून मोहरीची डाळ मिक्सरला बारीक करून घ्या. जाड बूडाच्या स्टीलच्या पातेल्यात गूळ पातळ करा,त्यात फेटलेली मोहरी,मीठ, जीरपूड,हिंग, मेथी पूड घाला. मिश्रणाला एक उकळी द्या. उकडून गार झालेल्या कैऱ्या देठांपाशी थोड्या उकलून घ्या. गूळाचे पातळ मिश्रण कैऱ्यांत भरा. त्या कैऱ्या काचेच्या मोठ्या तोंडाच्या बरणीत ठेवा. उरलेले गुळाचे मिश्रण त्यावर ओता. घट्ट झाकण लावून ठेवा (.फ्रीजमध्ये ठेवले तर वर्षभर टिकते.)वापरताना १ कैरी काढून ती काचेच्या बाऊल मध्ये कोळून घ्या म्हणजे तिचा सर्व गर काढून घ्या. त्यावर तेल मोहरी मेथ्यांची कडकडीत फोडणी घाला. एक उत्तम व औषधी तोंडीलावणे तयार.हे उत्तम पाचक आहे. तोंडाला चव आणते.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Kitchen Spices Brassica juncea Nutrition Ayurveda by Dr Neelima Rajguru