इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
जिरे
जिरे हा स्वयंपाक घरातील महत्वाचा पदार्थ आहे. जिरे मूळ आशिया मध्य आशियातील पीक आहे. तिथे ते पूर्वापार स्वयंपाक व औषधी म्हणून वापरात आहे.इराण ईजिप्त मध्ये त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. भारतात पण राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशात जिरे मोठ्या प्रमाणात पिकवतात .
कसे असते जिऱ्याचे झाड :-
जिऱ्याचे झाड साधारणपणे ५० सेंमी ते १ मिटर उंच असते. हे १ वर्षे जगणारे झुडूप आहे. पाने साधारण शेपूच्या पानांसारखी असतात.फुले लहान पांढरी व छत्रीसारखी गुच्छात येतात. ५ते७ गुच्छांचा एक मोठा गुच्छ असतो. याला पुढे लंबगोल फळे येतात आणि त्यात जे बी येते,ते म्हणजे आपण वापरतो ते जिरे. हे स्वयंपाकात तसेच औषधात पण वापरले जाते.एवढेच नाही तर पक्ष्यांचे खाद्य म्हणूनही ते वापरले जाते. या बीयांमध्ये काही उडनशील तेलं असतात.थायमिन नावाचे तेल जिऱ्यात जवळ जवळ ५% असते. त्यामुळे त्याला एकप्रकारचा सुगंध व चव असते. याशिवाय त्यात फॅट, प्रोटीन,फायबर्स, व्हिट्यामीन बी, ई,लोह, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज इ. घटक असतात.
गुण :-
जिरे हे चवीला तिखट ,पचायला हलके पण उष्ण असतात. त्यामुळे ते पित्त वाढवतात.
उपयोग :-
त्वचेवरील सुजेत बाहेरून जिऱ्याचा लेप करतात. खरूज, नायटा या मध्ये पण जिऱ्याच्या पाण्याने तो भाग धुतात आणि मग त्यावर जिरे चूर्णाचा कडुनिंब तेलात लेप करतात. मूळव्यधी मध्ये पण हा लेप उपयोगी पडतो. विंचू चावल्यावर हा लेप घातल्यास वेदना होत नाहीत. तोंड आल्यावर ,घसा दुखत असल्यास जिरे बारीक चावून तोंडात धरावेत.
जिरे भूक वाढवतात, पचनाला मदत करतात. पोटात गुबारा, जंत होऊ देत नाही. म्हणूनच ते रोज स्वयंपाकात वापरतात.
जिऱ्यांमुळे मूत्रप्रवृत्ती साफ होते. उन्हाळयात मूत्रप्रवृत्तीला आग होत असेल, कमी होत असेल तर रात्री १ चमचा जिरेपूड १ ग्लास पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यावे.या पाण्यात १ चमचा धनेपूड पण घालावी.॰
जिऱ्यांमुळे गर्भाशयाची सूज कमी होते. तसेच बाळंतपणात दूध चांगले येण्यासाठी गूळ व जिऱ्याचे चूर्ण देतात.
रोज १ छोटा चमचा जिरे खाल्याने प्रतिकार शक्ती वाढते.
आयुर्वेदात पचनासाठी, पोटातला गुबारा कमी करण्यासाठी अनेक औषधात , आसवारिष्टात जिरे वापरतात.
१ चिमूट हिराहिंग , पाव चमचा जिरे चूर्ण ,१ चिमूट सैंधव हे ह्रदय विकार असलेल्यांनी रोज जेवणा आधी साजूक तूपातून घ्यावे.
जिरा राईस पाककृती :-
साहित्य :- १ वाटी जुना बासमती तांदूळ, दोन चमचे जिरे , पाव चमचा हिरा हिंग, दोन हिरव्या मिरच्या , २ चमचे साजूक तूप , १ चमचा सैंधव ,कोथिंबीर
कृती :- प्रथम तांदूळ धूवून १तास ठेवावा. नंतर त्याचा मोकळा भात शिजवून घ्यावा. शिजल्यावर भात मोकळा करून गार होऊ द्यावा. कढईत तूप तापायला ठेवावे. तापल्यावर त्यात जिरे ,हिंग ,सैंधव , मिरच्या घालून जरा तळून घ्यावे. मग मोकळा शिजलेला भात घालून हलक्या हाताने हलवून घ्यावे. वरून कोथिंबीर घालावी. हा भात दालफ्राय , रस्साभाजी बरोबर वाढावा.
टिप:- ज्यांना गॅसेस होतात त्यांनी रोज भातात शिजताना १/४ चमचा जिरे घालावे. पोळ्या करतानाही त्यात जिरेपूड घालावी.
Kitchen Plants Spices Cumin Seeds Importance by Dr Neelima Rajguru