इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
मिरची
आपल्या भारतीय स्वयंपाक घरात लागणारा अत्यावश्यक पदार्थ! गंमत म्हणजे ही मुळातील आपली नाही. पोर्तुगीजांनी आपल्याला मिरचीची ओळख करून दिली असे म्हणतात. मेक्सिको हे मिरचीचे मूळ स्थान समजले जाते. पण सध्या भारताचा मिरची उत्पादनात सिंहाचा वाटा आहे. भारतीय मसाल्यातील मुख्य पदार्थ असलेल्या मिरचीबाबत आता आपण सविस्तर जाणून घेऊ…
आपण वापरतो ते मिरचीचे फळ आहे. कच्चे असतांना हिरवे असते आणि पिकल्यावर लाल होते. लाल मिरच्या वाळवून ,त्यांची देठे काढून लाल तिखट केले जाते. नुसती ताजी हिरवी ,लाल मिरची तसेच लाल तिखट वापरले जाते
मिरचीत कॅप्सिकिन नावाचे क्षारतत्व आहे.मिरचीचा तिखटपणा त्यामुळेच असतो. त्यामध्ये वेदनाशमन हा गुणधर्म आहे. तसेच मिरचीत अ ब क ई जीवनसत्व असतात.कॅल्शियम , फॅास्फरस ही खनिजे असतात. कसे असते मिरचीचे झाड? याचे छोटे झाड असते. त्याला मऊसर छोटी हिरवी- पोपटी रंगाची पाने असतात.
गुण :- मिरची ही तिखट, उष्ण ,कोरडेपणा आणणारी आहे.मिरचीने कफ,वात कमी होतो,तर पित्त वाढते. मिरचीने लाळ अधिक सुटते. त्यामुळे भूक लागणे,पचन होणे ही कामे होतात. हिरवी मिरची ह्रदयोत्तेजक आहे म्हणजे ह्रदयाचे कार्य नीट ठेवते.म्हणूनच मिरचीचा समावेश रोजच्या स्वयंपाकात असतो.
सूचना:- मिरचीचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यासच ती गुणकारी आहे.जास्त प्रमाणात मिरची वापरल्यास जळजळ,पित्त वाढणे,पोटात आग,जुलाब,मूळव्याध,पोटातले अल्सर यासारखेविकार होतात.
उपयोग:- १) मिरची पचन चांगले करते.भूक वाढवते.
२) मिरची कृमिनाशक आहे.
३) मिरची आम म्हणजे अपाचीत आहाररस होऊ देत नाही.
४) वेदना नाशकम्हणून उपयोगी पडते.कंबरदुखी , गृध्रसी यांत मिरची उपयोगी पडते.
५) बी काढलेल्या मिरच्या व कांद्याचा रस एकत्र करून खूप घोटावे,त्याच्या हरबऱ्या एवढ्या लहान गोळ्या करून जुलाब होत असतील तर द्याव्या.
६) कुत्रा चावला तर लाल मिरच्या वाटून लगेच जखमेत भरल्याने कुत्र्याचे विष कमी होते असे म्हणतात, जखम पिकत नाही व लवकर भरून यायला मदत होते. अर्थात हा प्रथमोपचार आहे हे लक्षात घेऊन लवकरात लवकर दवाखान्यात न्यावेच.
मिरच्या अतिप्रमाणात खाल्ल्याने होणारे तोटे :-
१) शौच्याला व मूत्रप्रवृत्तीच्या वेळी आग होते.क्वचित रक्त पडते. मूळव्याध जडू शकते.
२) रक्तातील ऊष्णता वाढते , पोटात व्रण ( अल्सर ) होतात .त्वचा रोग होतात.
३) दृष्टीला त्रास होतो.डोळ्यांची आग होते. डोळे लाल होतात.
४)स्त्रीयांना पाळीत जास्त अंगावरून जाणे , योनीची आग होणे असे त्रास होऊ शकतात.
५) पुरूषांमध्ये वंध्यत्व ,पुरूषत्वाचा नाश होणे असे त्रास होण्याची शक्यता असते.
मिरचीच्या पाककृती :——-
१) मिरचीचे लोणचे :-
धुवून देठ काढलेल्या हिरव्या मिरच्या पाव किलो, लिंबू रस अर्धी वाटी, मोहरी दाळ अर्धी वाटी ,बडीशोप पाव वाटी, धने २ चमचे , जिरे २ चमचे, तेल अर्घी वाटी, सैंधव – ४ चमचे( किंवा चवीप्रमाणे)हिंग १ चमचा.
कृती :- मिरच्यांचे पोट फोडून पाव इंचाचे तुकडे करावे. तेल कडकडीत करून ध्यावे .गॅस बंद करून त्यात हिंग, मोहरीची दाळ टाकावी. बडीशोप , धने ,जिरे किंचीत भाजून भरड कुटावे. हे कुट तेलात घालावे. गार झाल्यावर एका पातेल्यात मिरच्या व तेल,सैंधव एकत्र करावे.त्यात लिंबूरस घालावा. मिश्रण चांगले हलवून एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवावे.८ दिवसांत ते चांगले मुरते,मग वापरावे.थालिपीठ , मेतकुट भाताबरोबर तोंडी लावावे.
२) इमा दात्शी (Ema Datshi)
इमा म्हणजे मिरची व दात्शी म्हणजे चीज :- ही एक मिरचीची भूतानी रेसिपी आहे. मी भूतानला गेले होते , तेंव्हा खाल्ली व तिच्या प्रेमातच पडले.त्या स्थानिक रेस्टॅारंटच्या शेफला मी त्याची कृती विचारून घेतली.
१०-१२ धुवून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, १ मध्यम आकाराचा कांदा, १ तेवढाच टोमॅटो.१ कप अमूल चीज. ( तिकडे खास याकच्या दुधाचे घरी केलेले चीज वापरतात) , १ मोठा चमचा लोणी , चवीनुसार मीठ
कृती :- मिरच्यांची देठे काढून पोट फोडून घ्यावे. बीया काढून टाकाव्यात. कांदा ,टोमॅटोच्या पातळ ऊभ्या चकत्या कराव्यात .
एका कढईत लोणी टाकून ते पातळ झाल्यावर त्यात कांदा टाकून परतावा, मंद गॅस ठेवावा. कांद्याचा रंग बदलू देऊ नये. पांढरटच ठेवावा.कांदा मऊ झाल्यावर टोमॅटो टाकून परतून घ्यावा. नंतर त्यात मिरची टाकावी.५ मी. ती परतावी.नंतर त्यात चीज टाकावे. २ कप पाणी घालावे. चीज संपूर्ण वितळून त्याचा छान घट्ट सॅास होईपर्यंत मिश्रण उकळावे. याला साधारण १० मी. लागतात. शेवटी चवीनुसार मीठ घालावे आणि गॅस बंद करावा. हे गरम गरम नुसतेच किंवा भाताबरोबर खातात. खूपच चविष्ट लागते.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Kitchen Plants Green Red Chilly Neelima Rajguru