इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती –
आमसूल (कोकम)
उन्हाचा तडाखा वाढल्याने कोकम किंवा आमसूलाचे शरबत घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, अशी आपली समजूत आहे. त्याशिवाय त्याचे अन्य काय फायदे आहेत हे आपण आता जाणून घेऊया…
आमसूल (कोकम) याचा मोठा वृक्ष असतो. कोकण ,गोवा, केरळ या भागांत जास्त दिसतो. याला संस्कृत मध्ये वृक्षाम्ल ,मराठीत आमसूल किंवा कोकम व इंग्रजीत गार्सिनीया म्हणतात. या झाडाची फळे मध्यम आकाराच्या संत्र्याएवढी,गोल व लाल, जांभळी असतात. फळातील गर आंबट असतो. बी काढून तो विशिष्ट प्रक्रिया करून वाळवला जातो.त्यालाच आमसूल म्हणतात. रसापासून कोकम सरबत बनवतात. तसेच सोलकढी करण्यासाठी पण हा रस वापरतात. त्याला आगळ म्हणतात. याच्या बीयांतपण ३०% तेल असते.बाजारात कोकमतेल म्हणून ते मिळते. हल्ली ते कोकम बटर म्हणून प्रसिद्ध आहे. ते घट्ट असते. जखम भरण्यासाठी तसेच पायाला पडणाऱ्या भेगांवर, थंडीत ओठ फुटतात त्यावर हे तेल खूप उपयोगी पडते.
गुण :-
आमसूल पचायला हलके पण शरीराला कोरडेपणा आणणारे आहे.ते चवीला आंबटगोड असते. तसेच आमसूल किंचित ऊष्ण आहे. ते वात कमी करते.पण कफ व पित्त वाढवते.
उपयोग :-
१) उन्हाळयात खूप तहान लागते .आमसूलाचे सरबत ही तहान कमी करते. तसेच उन्हाळयात वाताचा त्रास त्यामुळं होत नाही.
२)आमसूल पदार्थांची चव वाढवते, भूक वाढवते. त्यामुळे रोजच्या जेवणात ते थोडेसे वापरावेच.
३) जुलाब होत असल्यास आमसूलाचे सरबत वारंवार पाजावे ,त्यामुळे जुलाब कमी होतात.
४) काविळीत पण आमसूलाचे सार , सरबत द्यावे. यकृतावर त्याची चांगली क्रिया होऊन त्यातून उपयुक्त स्राव स्रवण्यास मदत होते.
५) तापात आग, जळजळ ही लक्षणे असल्यास आमसूलाचे सरबत तसेच चटणी द्यावी.
६) हे उत्तम कृमिनाशक आहे.
७) अंगावर शीतपित्त उठत असेल (म्हणजे लालसर गांधी येत असतील) तर आमसूलाचे सार ,सरबत घ्यावे.
८)आमसूलाची चटणी दह्यावरच्या निवळीत कालवून खाल्ली तर रक्ती मूळव्याधीत फायदा होतो.
९)रोजच्या स्वयंपाकात भाजी आमटीत आमसूल वापरणे आरोग्यासाठी खूप हितकारक आहे.त्याने पचन चांगले होते. आतडी कार्यक्षम होतात .मलप्रवृत्ती चांगली होते.दूर्गंधीयुक्त होत नाही.
१०) आमसूलाचे तेल त्वचेसाठी उत्तम आहे. त्याने त्वचा मऊ, चमकदार होते. हल्ली नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने करण्यासाठी त्याचा वापर करतात.
आमसूलाची सोलकढी :———
साहित्य :- नारळाचे दूध ,२ ग्लास ,आगळ २ मोठे चमचे किंवा ६ आमसूले , साखर , मीठ चवीनुसार ,जीरपूड पाव चमचा , लसून २ पाकळ्या , हिरवी मिरची १ , बारीक चिरलेली कोथिंबीर १ चमचा, आले चवीनुसार
कृती :- नारळ फोडून तो खोवून किंवा बारीक तुकडे करून घ्यावा.नंतर त्यात नारळाचेच पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्यावा. हे मिश्रण गाळून घ्यावे . अशाप्रकारे नारळाचे दूध ताजे करून घ्यावे.आगळ असल्यास ते या दूधात टाकून हलवून घ्यावे. आगळ नसल्यास आमसूले ४-५ तास पाण्यात भिजत टाकून नंतर कुस्करून ते पाणी गाळून नारळाच्या दूधात टाकावे. यात लसून ,आले ,मिरची, जिरे बारीक करून टाकावे. मीठ ,साखर घालून चांगले हलवावे. वरून कोथिंबीर घालून प्यायला द्यावे.
मसाले भाताबरोबर सोलकढी छान लागते. उन्हाळयात सोलकढी खूप गुणकारी असते. पाचन करते तसेच शरीरात थंडावा निर्माण करते.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Kitchen Plants Aamsul Health benefit Nutrition by Nilima Rajguru