नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मतांवर डोळा ठेवून एकीकडे सरकार लाडली बहीण योजना राबवण्याचा गवगवा करत असले, तरी दुसऱ्या बाजूला मात्र गेले अनेक महिने विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार, वृद्धांचे मानधन आलेले नाही. त्यामुळे या अत्यंत गरीब आणि निराधार जनसमुहाला अत्यंत वाईट अवस्थेला सामोरे जावे लागत आहे. अकोले तालुक्यामध्ये लालबावटा निराधार युनियनच्या नेतृत्वाखाली ९ हजारांपेक्षा जास्त निराधारांना संघटनेच्या माध्यमातून दिलासा देण्याचे काम सुरू आहे. संघटनेच्या वतीने थकीत मानधन तातडीने द्या व मानधनात वाढ करून ते किमान ५ हजार रुपये करा या मागणीसाठी मेळाव्यांची मालिका सुरू करण्यात आली आहे. देवठाण येथे या अंतर्गत आज पहिला मेळावा घेण्यात आला. हिरडा हमी भाव व लागवड प्रोत्साहन मोहीम अंतर्गत यापूर्वी तालुक्यात कोतूळ, राजुर, शेंडी व समशेरपुर येथे विभागीय मिळावे संपन्न झाले आहेत.
कोतुळ येथे संपन्न झालेल्या ३३ दिवसांच्या दूध आंदोलनामध्ये मान्य झालेल्या मागण्यांची माहितीही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. दूध अनुदान अद्यापही सरकारने वर्ग केलेले नाही. याबाबत येत्या काळात आंदोलन उभारण्याबाबत यावेळी सूतोवाच करण्यात आले. सोयाबीनचे दर सातत्याने कोसळत असून हंगामाच्या सुरुवातीलाच दर ३५०० पर्यंत खाली कोसळले आहेत. केंद्र सरकारने सोयाबीनला 4892 रुपये प्रति क्विंटल आधारभाव जाहीर केला असताना हंगामापूर्वीच ३५०० पर्यंत भाव कोसळले असतील तर प्रत्यक्षात ज्यावेळी हंगामातील मुख्य पीक बाजारात येईल त्यावेळी हे भाव अधिक खाली जाण्याची भीती आहे. सरकारने याबाबत तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी किसान सभेच्या वतीने श्रमिक मेळाव्यामध्ये डॉ. अजित नवले यांनी केले.
शेतकरी, कर्मचारी, श्रमिक, शेतमजूर, विधवा, परितक्ता, अपंग, निराधार तसेच आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी, अंगणवाडी ताई, बांधकाम कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रमिकांच्या प्रश्नांबरोबरच आढळा बारमाही करण्याच्या दृष्टिकोनातूनही यावेळी चर्चा करण्यात आली. कॉम्रेड तुळशीराम कातोरे, सुमन विरनक, वकील ज्ञानेश्वर काकड, बळीराम गिऱ्हे, यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. मित्र पक्षांचे राम सहाणे, एकनाथ सहाणे, अनिल सहाणे, सुनील सहाणे, अजय शेळके, शंकर चोखंडे व श्रमिक चळवळीचे कॉम्रेड एकनाथ मेंगाळ, संगीता साळवे, हेमलता शेळके, जुबेदा मणियार आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आढळा खोरे बारमाही व्हावे यासाठीच्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाची व रोपे वाटपाची मोहीम किसान सभेच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. आढळा विभागात बहरु शकतील अशी सीताफळाची व जांभळाची रोपे यावेळी वितरित करण्यात आली.