नाशिक – वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या किसान रेलला जिल्ह्यातील शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शेतीमालाच्या वाहतुकीवर शासन पन्नास टक्के सबसिडी देत असल्याने जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील शेतक-यांचा शेकडो टन शेतमाल दर आठवड्याला परराज्यात विक्रीसाठी जात आहे. शेतक-यांचा प्रतिसाद पाहता किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस बोगी असाव्यात आणि सर्वच बोगी जिल्ह्यातीलच शेतक-यांच्या शेतमालासाठी राखीव असाव्यात यासाठीच्या खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. यापुढे आठवड्यातून मनमाड येथून सहा तर देवळाली कॅम्प, नाशिकरोड रेल्वेस्थानकाहून तीन दिवस किसान रेल धावणार आहे. तसेच स्पेशल किसान रेल ही आता तब्बल तेवीस बोगींची असणार आहे.
या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला, फळे व अन्य शेतमाल हा परराज्यात मोठ्या प्रमाणात जाणार आहे. परिणामी शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवार पासून तेवीस बोगींच्या स्पेशल किसान रेलचा देवळाली कॅम्प येथून शुभारंभ होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून ८० टक्के शेतकरी शेती व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भाजीपाला आणि शेतीमाल पिकविण्यात नाशिक जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे.परंतु जिल्हयातील शेतीमाल रेल्वेमार्गाने इतर राज्यामध्ये पोहचविण्याची कोणतीही सुविधा नसल्याने शेतकरी त्रस्त होते. जिल्हयातील शेतीमाल विक्रीसाठी रोज रेल्वेमागनि परराज्यात नेता यावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न सुरू होते.
अखेर केंद्र शासनाने शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वर्षभरापूर्वी किसान रेल्वे सुरू केली. आठवड्यातून एक वेळेस देवळाली कॅम्प ते बिहारमधील दाणापूर यादरम्यान देशातील पहिली किसान रेल सुरू झाली. कृषीरेलला वाढता प्रतिसाद पाहून आठवड्यातून एक ऐवजी तीन दिवस किसान रेल सुरू केली हो.ती या किसान रेलला नऊ बोगी असून नाशिक, मनमाड आणि देवळाली कॅम्प या रेल्वे स्थानकासाठी प्रत्येकी दोन बोगी शेतीमाल वाहतूकीसाठी वापरात येत असत. परंतु शेतीमालाची प्रचंड आवक असल्याने रेल्वेस्थानकांच्या वाट्याला येणा-या या बोगी खुपच कमी पडत होत्या. यातुनच गेल्या काही महिन्यांपासून किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस बोगी असाव्यात यासाठी गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर आज गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
येत्या सोमवारपासून (दि.२३ ऑगस्ट)किसान रेल मनमाड रेल्वे स्थानकाहून आठवड्यातून सहा तर देवळाली कॅम्प नाशिकरोड रेल्वेस्थानकाहून तीन दिवस धावणार आहे. यापुढे किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस बोगी असणार आहे. सोलापूर जवळील सागोला येथून येणारी किसान रेल मनमाड मार्गे जाणार असल्याने मनमाड येथील शेतक-यांना या रेलचा फायदा आठवडयातून सहा दिवस होणार आहे.
तेवीस बोगीपैकी मनमाड, देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड या रेल्वे स्थानकासाठी प्रत्येकी सहा बोगी शेतीमाल वाहतुकीसाठी मिळणार आहेत. पूर्वी अवघ्या नऊ योगी असलेली किसान रेल आठवडयाभरातून तीन दिवस धावत असल्याने जिल्ह्यातील शेतक-यांचा शेतीमाल रेल्वेस्थानकांवर मोठया प्रमाणावर पडून राहत असे. यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून शेतक-यांची कुचंबना होत असे. यापुढे किसान रेल तेवीस बोगींची असणार असल्याने नाशवंत शेतीमालाचे नुकसान टळणार असून शेतक-यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी रोज परराज्यातील बाजारपेठांचा लाभ मिळणार आहे.
किसान रेल यापुढे आठवडयातून मनमाड येथून सहा तर देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथून मंगळवार, गुरूवार आणि शनिवार या तीन दिवशी धावणार आहे. किसान रेलच्या माध्यमातून रोज सुमारे पाचशे टन शेतीमाल परराज्यात जाणार आहे. यामुळे जिल्हयातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हावासियांना आपला शेतीमाल गुवाहाटी, कलकत्ता येथे विकिसाठी नेता यावा यासाठी रेल्वेसेवा असावी यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.