नाशिक – देशातील पहिली किसान रेल सुरू होण्यास आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात भाडेपोटी शेतक – यांना तब्बल सव्वा तीन कोटी रूपयांची सबसिडी मिळाली असून जिल्हयातून १६ हजार ५०० टन शेतीमाल परराज्यात पाठविण्यात आला असून भुसावळ डिव्हीजन मधून किसान रेलला सुमारे १६ कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे दरम्यान आठवडयातून तीन दिवस धावणारी किसान रेल आता येत्या सोमवार पासून आठवडयातून चार दिवस धावणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
जिल्हयातील शेतक – यांचा शेतीमाल देशभरातील राज्यांमध्ये विकीसाठी नेता यावा यासाठी केंद्रशासनाकडे खासदार गोडसे यांनी सततचा पाठपुरावा करून किसान रेल सुरू केली होती आज किसान रेलला एक वर्ष पूर्ण झाले आहे . प्रारंभी आठवड्यातून एकच वेळेस किसान रेल देवळाली कॅम्प रेल्वेस्टेशन ते मुजफ्फरपुर (बिहार) या मार्गावर धावत होती.
जिल्हयातील शेतक-यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून शासनाने किसान रेल आठवडयातून मंगळवार , गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सुरू केली होती गेल्या वर्षभरात भुसावळ विभागातून २६ हजार टन शेतीमाल परराज्यामध्ये किसान रेल मधून पाठविण्यात आला. यापोटी शासनाला ९ कोटी १६ लाख रूपयांचा महसूल मिळाला.
नाशिक जिल्हयातील देवळाली कॅम्प रेल्वेस्टेशन येथून ५ हजार टन शेतीमालाची वाहतूक करण्यात आली यापोटी शासनाला २ कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध झाला नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून ६ हजार टन तर मनमाड रेल्वे स्थानकावरून ५ हजार ५०० टन शेतीमाल किसान रेलच्या माध्यमातून परराज्यात पाठविण्यात आला यापोटी शासनाला नाशिक आणि मनमाड येथून ४ कोटी ५० लक्ष रूपयांचा महसूल मिळाला आहे.
शेतक-यांकडून किसान रेलला मिळणारा प्रतिसाद पाहता किसान रेल आठवडयातून तीन ऐवजी चार दिवस सुरू करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून खासदार हेमंत गोडसे करत होते . गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले असून येत्या सोमवार पासून किसान रेल आठवडयातून चार दिवस धावणार आहे .