इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशभरातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेल्या विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते विशेष दौऱ्यासाठी येत आहेत. सरकारच्या धोरणामुळे उद्भवलेल्या शेती अरिष्ठाचा परिणाम म्हणून देशभर शेतकरी आत्महत्या करत आहेत. देशभरातील सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात व त्यातही विदर्भात झाल्या आहेत. त्यात आणखी भर म्हणजे सरकारने कापूस आयातीवरील ११% शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर (AIDC) रद्द करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच ट्रम्प यांनी टेरीफ दादागिरी करत भारताच्या कापड निर्यातीवर ५० टक्के कर लादला आहे. या साऱ्याचा अत्यंत वाईट परिणाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये यामुळे वाढ होणार आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकरी आत्महत्या व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत या दोन्ही बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे.
अशा पार्श्वभूमीवर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे.
दिल्ली येथे झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाचे दिग्गज शेतकरी नेते महाराष्ट्रात अशा प्रकारे संयुक्तरीत्या पहिल्यांदाच दौऱ्यावर येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर याबाबत त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या मनात याबाबत तीव्र संताप खदखदतो आहे. विविध शेतकरी संघटना एकत्र येत या प्रश्नावर आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे नेते या दौऱ्यामध्ये एकत्र सहभागी होत असून वरील सर्व शेतकरी प्रश्नांबाबत आंदोलनाची रूपरेषा ठरवणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाच्या या दौऱ्याची सुरुवात दिनांक १७ सप्टेंबर रोजी वर्धा येथील गांधी आश्रम या ठिकाणावरून होणार असून डॉ. अशोक ढवळे, विजू कृष्णन, राकेश टिकैत, युधवीर सिंग, पी. कृष्णप्रसाद, के. डी. सिंग, राजन क्षीरसागर, तजिंदरसिंग विर्क, रामिंदर सिंग पटियाला, गुरमीत सिंग मेहमा, राजेंद्र बावके, अनिल त्यागी, ॲड. शिव सिंग, उद्धव शिंदे, किशोर ढमाले, गोपीनाथ कांबळे, सुशीला मोराळे, ममिदला बिक्सापती, मांडला वेंकण्णा, दासू बालेसाहेब, सुखविंदर सिंग औलख, सतीश आझाद, शशी कांत, विजय जावंदिया, एस. व्ही. जाधव, माधुरी खडसे, शालिनी वानखेडे या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या शेतकरी प्रश्नांबाबत शेतकरी अभ्यासकांशी चर्चा, शेतकरी नेत्यांशी विचारविनिमय, महिला शेतकऱ्यांबाबत काम करणाऱ्या संघटनांची चर्चा, शेतकरी मेळावा व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटी असा कार्यक्रम असेल.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी अमरावती येथे संयुक्त किसान मोर्चाची पत्रकार परिषद होईल. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी या दिवशी अमरावती जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला असून एस.के. एम. चे नेते या मेळाव्यास भेट देतील व सहभाग नोंदवतील. अमरावती जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन ट्रम्प यांची टेरिफ दादागिरी व केंद्र सरकारने घेतलेले कापूस धोरण याचा शेती व शेतकऱ्यांवर होणारा परिणाम याबाबत संयुक्त किसान मोर्चाचे नेते शेतकऱ्यांची चर्चा करतील.
देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी अकोला येथे परिसंवादाचे आयोजन केले असून महाराष्ट्रभरातून राजू शेट्टी, बच्चू कडू, प्रकाश पोहरे, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेते या परिसंवादात सहभागी होणार आहेत.