नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कीर्ति कला मंदिर या भारतातील प्रतिष्ठित नृत्यसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “सुवर्णरेखा” या विशेष महोत्सवाअंतर्गत “कलाहोत्र” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कला मंदिरात करण्यात आले. या संपूर्ण सोहळ्यात विविध नृत्यशैलींमधून स्त्रीशक्ती, भक्ती, परंपरा आणि भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा यांचे सुरेख दर्शन घडले.
कलाहोत्र कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी, (दि .२४ एप्रिल) गुरु. रेखाताई नाडगौडा, गुरु. अदितीताई पानसे, शोभनाताई दातार, डॉ.विजयालक्ष्मी गणोरकर आणि डॉ. मीना बापये यांनी कार्यक्रमाच्या दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून केले. त्यानंतर सुभाष दसककर यांनी हार्मोनियमवर राग किरवाणी सादर केला. त्यानंतर अनिल दैठणकर यांचे व्हायोलिन सोलो, रूपाली काळे यांचे निर्गुणी भजन, प्रसाद खापर्डे यांचे राग तोडी, नरेंद्र पुली यांचे गिटार वादन, संगीता पेठकर यांचे संवाद, प्रेषिता पाठक यांचे दशावतार, सोनाली करंदीकर यांचे शिवशक्ती, दीपा बक्षी यांचे गणेश वंदना आणि वसंत बहार, अपर्णा पेंडसे यांचे भीष्म स्तुती, कीर्ती भवाळकर व सायली मोहाडकर आणि शिष्या यांचे एकत्व यांचे खुमासदार सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात गौरी शर्मा यांचे कीर्तन, शिल्पा देशमुख व शिष्या यांचे स्वातंत्र्य योधिनी, अपर्णा भट व शिष्या यांचे रामस्तुती, मनाली देव यांचे दशावतार, ज्ञानदा सोनार यांचे ताल गुंजन, अफसर खान यांचे कथ्थक प्रस्तुती, नीलिमा देशपांडे यांचे कैलास, कीर्ती शुक्ल यांचे ‘विष्णवे नमः’, रश्मी जंगम यांचे इबादत, रंजना फडके यांचे भंग-अभंग, नेहा मुथियन यांचे ‘अस्तित्व : एक खोज’, डॉ. सुमुखी अथनी यांचे ‘भजे पांडुरंग’, मेधा दिवेकर यांचे नृत्यधिपती, मैत्रेयी मुंडले यांचे ‘नाळ: बॅक टू द रूट्स’, वृषाली चितळे-लेले व रामा कुकनूर यांचे संवेदन, शिल्पा सुगंधी यांचे शिवस्तुती, प्राजक्ता वर्टी-भट यांचे ‘अभिवादन भूमिपुत्राला’ आणि राजश्री जावडेकर यांचे स्त्रीशक्ती अशा विविध नृत्यरचना सादर केल्या.
एकंदरीत या दोन दिवसीय कलाहोत्र सोहळ्याने नृत्यातील गती आणि प्रगतीला नव्या उंचीवर नेले. पारंपरिक आणि आधुनिक नृत्यशैलींचा मिलाफ, गती, ताल आणि भावभावनांचा अद्वितीय संगम उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारा होता. कथ्थक, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिसी, मोहनियाट्टम आणि समकालीन शैली यांच्या सादरीकरणातून भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सौंदर्याची आणि त्यामधील गूढतेची अनुभूती रसिकांना मिळाली. या दोन दिवसांच्या अखंड सांस्कृतिक पर्वात ६४ संस्थांचे ६०० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. कीर्ति कला मंदिर गेली ५० वर्षे कथ्थकच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करत आहे. या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कलाहोत्र कार्यक्रम नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरला.
हा सोहळा नृत्याच्या माध्यमातून कला आणि संस्कृतीच्या विविध पैलूंचा उलगडा करण्यासाठी आयोजित केला गेला होता. नृत्यप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला, जिथे प्रत्येक नर्तकाने गती आणि प्रगतीचे महत्त्व सादर केले. कलाहोत्र सोहळ्याच्या आयोजनाने नृत्य क्षेत्रात नवनवीन विचार आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कलेला एक नवा आयाम दिला आणि त्याचे स्थान समाजात अधिक मजबूत केले. नृत्य, शब्द, संगीत, गती आणि भक्ती या चतुरंगांना व्यक्त करणारी दृश्य कविता आहे. शरीर हे एक चालतं फिरतं मंदिर आहे. ते दिव्यत्वाला जोडणारे एक माध्यम आहे. जगण्याचा पोत समृद्ध करण्याची शक्ती कलेत आहे, हे दोन दिवस अविरत चाललेल्या कलाहोत्रने सिद्ध केलं. प्रेक्षकांच्या उदंड उत्साहात आणि प्रतिसादात कलाहोत्रचा समारोप झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन डॉ. वैशाली बालाजीवाले, याज्ञश्री धार्वेकर आणि पियू आरोळे यांनी केले. तसेच प्रकाश योजना राम नवले व आदित्य राहणे यांनी सांभाळली, तर नेपथ्य आणि रंगमंच व्यवस्था दत्तात्रय सोनवणे यांनी सांभाळली.