नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कीर्ति कला मंदिर या भारतातील प्रतिष्ठित नृत्यसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून “सुवर्णरेखा” या विशेष महोत्सवांतर्गत “कलाहोत्र” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन कालिदास कला मंदिर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन झेलम परांजपे, रेखा नाडगौडा, शोभना दातार आणि शुभांगी दामले यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्याच दिवशी विविध नृत्यशैलींमधून स्त्रीशक्ती, भक्ती, परंपरा आणि भारतीय शास्त्रीय नृत्याची समृद्ध परंपरा यांचे सुरेख दर्शन घडले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अदिती पानसे यांच्या “आली राधिका अंगणी” या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच प्राजक्ता गोगटे यांनी देवी धृपद , मनाली कुलकर्णी व शिष्या यांनी समर्पण, अनुजा शाह यांनी सावरे रंग, झेलम परांजपे यांनी संत चोखा मेळा, संगीताचार्य रुपाली देसाई यांनी कथ्थक नृत्य शैलीतील गणेशाचे अधिष्ठान , श्रीजा वारीअर यांनी मोहिनीयाट्टम, आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी परंपरा , शीतल कोलवलकर यांनी तराणा प्रवाह, संध्या पुरेचा यांनी भरत नाट्यम प्रस्तुती , अमीरा-अवनी यांनी कथ्थक ओडिसी, नंदकिशोर कपोते यांनी कथ्थक प्रस्तुती लखनौ परंपरा – तराणा, लतासना देवी यांनी भगवती स्तुती व नयनतारा मोक्ष , उमा रेळे यांनी त्याग या अन्याय , तेजस्विनी साठे यांनी होरी, देविका बोरथकुर यांनी सत्रीया नृत्य, लीना केतकर यांनी कर्ण तेजमान पुत्र, स्वरदा भावे यांनी शिवतांडव स्तोत्र व चरीष्णू, नियती विसाळ यांनी ब्युटी अँड द बिहोल्डर, ज्ञानेश्वर कासार यांनी अखंडमंडलाकारं, मोहन उपासनी यांनी वेणूमधुरम्, मधुरा बेळे यांनी शास्त्रीय संगीत गायन, जयंत नाईक यांनी तिश्र जाती तीनताल, डॉ. आशिष रानडे यांनी श्रीराम स्तुती, ओंकार वैरागकर यांनी राग रागेश्री झपताल मध्ये गत व त्यातच झपतालातील वादन, नितीन वारे यांनी युवारंग, जगदेव वैरागकर यांनी “का कही गाऊँ”, नितीन पवार यांनी तबला सहवादन, सुभाष दसककर यांनी हार्मोनियमवर राग किरवाणी, अनिल दैठणकर यांनी वायोलिन सोलो, रुपाली काळे यांनी निर्गुणी भजन, प्रसाद खापर्डे यांनी राग तोडी, नरेंद्र पुली यांचे गिटार वादन, संगीता पेठकर यांनी संवाद, प्रेषिता पथक यांनी दशावतार, सोनाली करंदीकर यांनी शिवशक्ती, दीप बक्षी यांनी गणेश वंदना आणि वसंत बहार, आणि अपर्णा पेंडसे यांनी भीष्म स्तुती अशा विविध नृत्यरचना सादर केल्या.
कथक, भरतनाट्यम, मणिपुरी, ओडिसी, मोहनियाट्टम आणि समकालीन शैली यांच्या सादरीकरणांतून भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सौंदर्याची आणि त्यामधील गूढतेची अनुभूती रसिकांना मिळाली. या दोन दिवसांच्या अखंड सांस्कृतिक पर्वात ६४ संस्थांचे ६०० हून अधिक कलाकार सहभागी होत आहेत.
कीर्ति कला मंदिर गेली ५० वर्षे कथ्थकच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करत आहे. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कलाहोत्र कार्यक्रम नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून, आज दुसऱ्या दिवशी देखील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय शास्त्रीय कलांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.