नाशिक – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन वादग्रस्त विधान केले होते. हे प्रकरण थेट न्यायालयात गेले होते. त्यानंतर त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती. आता त्यांनी थेट कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरुनच वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे ही बाब देशपातळीवर गाजणारी ठरत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला जात आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला आहे. अशातच आता एक गंभीर बाब समोर आली आहे. कीर्तनकार निवृत्तीनाथ इंदोरीकर यांनी लसीकरणाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इंदोरीकर यांचे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कीर्तन होते. त्यात ते म्हणाले की, मी कोरोनाची लस घेतली नाही आणि यापुढेही घेणार नाही. कोरोनाच्या काळात माणुसकीला काळीमा फासण्यात आली. कोरोना झालेल्या व्यक्तीला जणू वाळीत टाकण्यात आले. त्या व्यक्तीच्या विविध वस्तू जसे गोधडी हे सुद्धा जाळण्यात आले. त्याला स्पर्श होऊ नये असे वागण्यात आले. पण, मी लस घेतली नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची असे इंदोरीकर यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच, याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही केली जात आहे.